शिवाजी महाराजांनी बालपणाच्या संस्कारातून केवळ रामायण, महाभारताचाच अभ्यास केला नव्हता तर शास्त्रांमध्ये चाणक्याच्या कूटनितीचादेखील अभ्यास केला होता. हाची साक्ष देणारा किल्ले पुरंदर. वयाच्या 18 व्या वर्षी प्रथमतः पुरंदर ताब्यात घेतल्यानंतर महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक पराक्रम व घटनांमधील त्यांनी कूटनितीज्ञ म्हणून घेतलेले महत्त्वाचे तीन निर्णय याच किल्ले पुरंदराच्या छायेत घेतले आहेत आणि यशस्वीही करुन दाखविले आहेत. स्वराज्याच्या संरक्षणात मोलाची कामगिरी बजावणारा हा किल्ले पुरंदर १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म याच किल्ले पुरंदरावर झाला.
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे.
तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
रायरेश्वरासमोर सहकार्यांसह शपथ घेऊन शिवरायांनी ईश्वरी कार्याला प्रारंभ केला होता. हे कार्य अत्यंत दुर्घट आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधलेली असली, तरी राजांच्या आयुष्यात सत्त्वपरीक्षेचा क्षण फार लवकर आला. शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव आदिलशहाने घेतलेला होताच. आता शिवाजी महाराजही आदिलशहाचा भूप्रदेश घेऊ लागले होते. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा चालू झाली आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचा, तर प्रथम शहाजीला अटक केली पाहिजे, असा कट शिजला. २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांना जिंजीला अटक झाली. हे कार्य पूर्ण केले ते मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे यांनी ! यानंतर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला पाठवले. राजे दुहेरी संकटात सापडले. त्यातच आतापर्यंत मार्गदर्शन करणारे दादोजी स्वर्गवासी झालेले. अशा परिस्थितीत एकाच वेळी वडिलांवर आणि राज्यावरही संकट ! राजांपुढे दोन पर्याय होते – लढाई किंवा शरणागती. शरणागती स्वीकारल्यास घेतलेला भूप्रदेश देऊन आदिलशहाची चाकरी स्वीकारावी लागली असती; म्हणजे स्वराज्य सोडून गुलामी. एवढे करून वडिलांवरचे संकट दूर होईल, याची कोणतीही शाश्वती नव्हती. अर्थात् राजांनी पहिला पर्याय स्वीकारला. राजांनी लढण्याचा निर्णय घेतला.येथेच कूटनितीज्ञ म्हणून शिवरायांची चुणूक दिसली.
कौटिल्याने युद्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत – विक्रमस्य प्रकाशयुद्धं, कूटयुद्धं, तूष्णीयुद्धम्. या तीन युद्धांपैकी राजांनी, भीतीने गाळण उडवणे, अचानक आक्रमण करणे, गैरसावध अथवा संकटात असता झोडपणे, एका ठिकाणी माघार आणि उलट परतून आक्रमण या डावपेचांनी युक्त अशा कूटयुद्धाची निवड केली. कारण राजांसाठी प्रकाशयुद्धाचा पर्याय नव्हताच, कारण सैन्य तुटपुंजे होते. फतेखानची मोहीम नक्की झाल्यावर आदिलशहाने उत्रावळीच्या केदारजी खोपडेला फर्मान पाठवले होते. त्यात स्पष्टच लिहिले होते, फतेखान खुदावंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्माविली आहे. तरी हे फर्मान पोचताच त्याने स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन त्याच्या आज्ञेत राहून दिवाणाची मसलत करावी.. थोडक्यात त्या तुटपुंज्या सैन्यालासुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला. केदारजीचे फर्मान हे केवळ वानगीदाखल. ऋतुमानाचा विचार करायला वेळच नव्हता, कारण युद्ध शिवाजी महाराजांनी आरंभले नव्हते. त्यामुळे शत्रूचा सामना करणे एवढी एकच गोष्ट राजांच्या हातात होती. आता प्रश्न उरला तो फक्त अनुकूल भूमीचा आणि राजांनी ती अनुकूल भूमी हेरली. या वेळी राजांचे राज्य होते ते पुणे, इंदापूर, सुपे आणि काही मावळ भाग. कोंढाणा, तोरणा आणि राजगड हे किल्ले. सर्व मिळून आठशे गावे आणि थोडीफार शहरे. राजांनी निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या तळहाताएवढ्या स्वराज्यात शत्रूला प्रवेश करू द्यायचा नाही. या युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा उपयोग करायचा आणि राजांनी निवड केली पुरंदर गडाची.
पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर होता. सासवडपासून सहा मैल पश्चिमेला डोंगराळ मुलुख, तर पूर्वेला सपाट मैदान, वायव्येला तेरा-चौदा मैलांवर सिंहगड, पश्चिमेला एकोणीस-वीस मैलांवर राजगड, असा पुरंदर होता. या तीन किल्ल्यांच्या मधला प्रदेश डोंगराळ असल्याने शत्रूला आत शिरणे कठीण, किल्ला मोठा आणि मजबूत. त्यामुळे गडावर मोठी शिबंदी राहू शकते. गडाची पश्चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू दुर्गम. सर्वार्थाने किल्ला योग्य होता; पण अडचण अशी की, तो शत्रूच्या कह्यात होता. तरीसुद्धा जमेची बाजू म्हणजे पुरंदरचे किल्लेदार महादजी नीळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजे यांचा जुना स्नेह होता. त्यातच सरनाईक आता वृद्ध झाले होते आणि त्यांच्या चार पुत्रांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. या परिस्थितीचा लाभ घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला; पण कह्यात घेतला नाही. म्हणजे किल्ला अजूनही शत्रूच्याच कह्यात होता. याचा अर्थ शत्रूची भूमी शत्रूशीच लढण्यासाठी राजांनी वापरली. केदारजीच्या पत्रावरून स्पष्ट होते की, खानाला आदिलशहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले होते; पण राजे असे अचानक पुढे आल्यामुळे फतेहखानाला आपला विचार पालटावा लागला. कोंढाण्याकडे जाण्याऐवजी त्याने बेलसरजवळ मुक्काम केला. साधारणपणे ऑक्टोबर १६४८ ला खान तेथे पोचला असे मानले जाते. खान असेच करेल ही अटकळ राजांनी बांधली होती. आता राजांच्या कूटयुद्धाला प्रारंभ झाला. छावणी पडल्याबरोबर खानाने राजांच्या शक्तीचा अंदाज घ्यावा आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा; म्हणून बाळाजी हैबतरावाला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले. खान स्वराजाच्या दिशेने निघाला असतांना राजांनी हा छोटा किल्ला घेतला होता. खानाच्या या योजनेमुळे त्याचे सैन्य विभागले गेले. म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ला लढवलाच नाही. कौटिल्याच्या सूत्रानुसार त्यांनी आपले बल किंवा सैन्य दूष्य असल्याचे भासवले आणि त्याच वेळी जितम् असा विश्वास खानाच्या मनात निर्माण केला. बाळाजीने हा किल्ला सहज जिंकला. खानाला विजयाचा आनंद देऊन बेसावध करण्यासाठी हा किल्ला सोडून दिला गेला. किल्ला सहजपणे हाती आल्यामुळे बाळाजी आणि त्याचे सैन्य या पहिल्या यशाने आनंदित झाले होते. शिवाजी महाराजांच्या नीतीचा त्यांना अंदाजच आला नव्हता. एकत्र त्यागघातौ म्हणजे एकाच वेळी माघार आणि परतून हल्ला या कूटयुद्धातल्या दुसर्या खेळीला राजांची सुरुवात झाली. खान बेसावध झाला, पण अविश्वस्त किंवा सावध राजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी ओणि भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी सत्र म्हणजे दबा धरून बसली. पहाटे शत्रू गाफील असतांना या सैन्याने आक्रमण केले. अशा आक्रमणाची कल्पनाच कोणी केली नव्हती. बाळाजीने गढीचा दरवाजा लावून घेतला; पण आदिलशहाच्या कारकीर्दीत कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता. मावळ्यांनी कोट खणायला प्रारंभ केला. काही जणांनी शिड्या चढायला प्रारंभ केला. बाळाजीच्या सैन्याने दगड, गोटे, पलिते मिळेल त्याने प्रतिकार करायला प्रारंभ केला; पण मराठे इरेला पेटले होते. बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने वेस फोडली. मराठ्यांचा आवेश पाहून हैबतरावाचा आणि सैन्याचा धीर सुटू लागला. शेवटी कावजीने हैबतरावाला ठार केले, हैबतरावाचे सैन्य शरण आले. शिरवळवरील लूट पुरंदरावर आली.
राजांनी एक तुकडी शिरवळवर पाठवली, त्याच वेळी दुसरी तुकडी फतेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. याचे नेतृत्व बाजी पासलकर करत होते. थोड्या वेळात फतेखानच्या सैन्याने कडवा प्रतिकार आरंभला. खानाच्या सैन्यापुढे राजांचे सैन्य अगदीच तुटपुंजे होते. बाजीच्या सैन्याची हानी होऊ लागली. या झटापटीत निशाणाची तुकडी फतेखानाच्या सैन्याच्या तावडीत सापडली. ते पाहून बाजी जेधे पुढे सरसावला. निशाणाचा भाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन तो परत फिरला. त्याच्या मागोमाग सारे सैन्य परतले. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे आणि सैन्य परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी या पोराने आपला पराभव केला या कल्पनेने संतापलेल्या फतेखानाने पुरंदरावर आक्रमण केले. राजांचे सैन्य किल्ल्यात वरच्या बाजूला होते. त्याचा फायदा घेऊन फतेखानाचे सैन्य मार्याच्या टप्प्यात आल्यावर वरच्या दिशेने दगड, बाण यांचा मारा चालू झाला. सैन्य या मार्याने आणि वर चढण्याने दमलेले असतांना राजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला अन् ताज्या फौजेला बाहेर काढले. फार मोठी हातघाई झाली. गोदाजीने मुसेखानाच्या छातीत आपला भाला घुसवला. खानही अतिशय पराक्रमी होता. त्याने तो बाहेर काढला आणि त्याही परिस्थितीत तलवारीने लढू लागला. पण गोदाजीच्या वाराने मुसेखान खांद्यापासून मध्यभागपर्यंत चिरला जाऊन गतप्राण झाला. मुसेखानाची अवस्था पाहून फतेखानाचे सैन्य घाबरले आणि पळत सुटले. अत्यंत उत्साहात असणार्या मराठ्यांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. यात बाजी पासलकर ठार झाले; पण स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी झाली. एकीकडे फतेखानला तोंड देतांना शहाजीराजांच्या सुटकेसाठी राजांनी संधीचा विचार केला. ल्यबळ आणि बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी विग्रह. राजे हीच खेळी खेळले. तुलनेने कमी शक्तीशाली आदिलशहाशी राजांनी लढाई केली आणि सामर्थ्यशाली दिल्लीशी संधी. त्यांनी गुजराथचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशहाला एक विनंतीअर्ज पाठवला. त्यात त्यांनी मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी आदिलशहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी, अशी विनंती केली. राजांचा हा अर्ज मान्य झाला. शहाजीराजांच्या अटक प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा सरदार मुस्तफाखान त्याच वेळी मेला. त्यामुळे आदिलशहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.
कूटनितीज्ञ म्हणून महाराज यशस्वी ठरल्याचा दुसरा प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. 'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, 'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.' खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी, पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खिरदुर्ग (सागरगड), मानगड.
या तहानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले आणि आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कूटनीतीमधील परमोत्कर्ष बिंदू इतिहासात आपल्या सर्वांना विदीत आहेच. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या या तीन महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार होता हा किल्ले पुरंदर.
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत. 1) बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'. 2) पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 3) रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्या च्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो. 4) दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. 5) खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो. 6) पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते. 7) शेंदर्या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्या बुरूज. 8) केदारेश्वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे. 9) पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात. 10) भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. 11) वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणार्या सासवड या गावी यावे लागते. सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे.येथे जाताना कोणतेही आयडी कार्ड घेऊन जावे (आधार ,पँन कार्ड, मतदान ओळखपञ इत्यादी) जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.
पुरंदर किल्ल्यावर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात फुल फूलतात. सप्टेंबर २०१३ मध्ये ट्रेक क्षितिज संस्थेने ८४ फुलांची नोंद केली यात काही दुर्मिळ फुल तर काही केवळ पुरंदरवर आढळणारी फुल आहेत. सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो. वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.
(संदर्भ - दुर्गदर्शन - गो.नी.दांडेकर, शिवाजी हिज लाइफ अॅण्ड टाइम्स, ग. भा. मेहेंदळे)
योगेश शुक्ला (जळगाव)