Search This Blog

Saturday, June 30, 2018

३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या मुरुड जंजिर्‍याच्या जलदुर्गावर .........

३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या मुरुड जंजिर्‍याच्या जलदुर्गावर अनेकांनी विजय मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यात सर्वात यशस्वी चढाई करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे होते. त्यांनी प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. ती तारीख होती 22 जून.
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.
संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.” मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच. पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले
हा इतिहास झाला परंतु मुरुड जंजिर्‍याविषयी जाणून घेणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे.
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."
जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.' असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.
info by Yogesh shukla Jalgaon

किल्ले पुरंदर


शिवाजी महाराजांनी बालपणाच्या संस्कारातून केवळ रामायण, महाभारताचाच अभ्यास केला नव्हता तर शास्त्रांमध्ये चाणक्याच्या कूटनितीचादेखील अभ्यास केला होता. हाची साक्ष देणारा किल्ले पुरंदर. वयाच्या 18 व्या वर्षी प्रथमतः पुरंदर ताब्यात घेतल्यानंतर महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक पराक्रम व घटनांमधील त्यांनी कूटनितीज्ञ म्हणून घेतलेले महत्त्वाचे तीन निर्णय याच किल्ले पुरंदराच्या छायेत घेतले आहेत आणि यशस्वीही करुन दाखविले आहेत. स्वराज्याच्या संरक्षणात मोलाची कामगिरी बजावणारा हा किल्ले पुरंदर  १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म याच किल्ले पुरंदरावर झाला.
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे.
तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.  पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
रायरेश्‍वरासमोर सहकार्‍यांसह शपथ घेऊन शिवरायांनी ईश्‍वरी कार्याला प्रारंभ केला होता. हे कार्य अत्यंत दुर्घट आहे, याची खूणगाठ त्यांनी बांधलेली असली, तरी राजांच्या आयुष्यात सत्त्वपरीक्षेचा क्षण फार लवकर आला. शहाजीराजांच्या बंडखोरीचा अनुभव आदिलशहाने घेतलेला होताच. आता शिवाजी महाराजही आदिलशहाचा भूप्रदेश घेऊ लागले होते. या सगळ्याविरुद्ध विजापूर दरबारात चर्चा चालू झाली आणि शिवाजी महाराजांना अटकाव करायचा, तर प्रथम शहाजीला अटक केली पाहिजे, असा कट शिजला. २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांना जिंजीला अटक झाली. हे कार्य पूर्ण केले ते मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे यांनी ! यानंतर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला पाठवले. राजे दुहेरी संकटात सापडले. त्यातच आतापर्यंत मार्गदर्शन करणारे दादोजी स्वर्गवासी झालेले. अशा परिस्थितीत एकाच वेळी वडिलांवर आणि राज्यावरही संकट ! राजांपुढे दोन पर्याय होते – लढाई किंवा शरणागती. शरणागती स्वीकारल्यास घेतलेला भूप्रदेश देऊन आदिलशहाची चाकरी स्वीकारावी लागली असती; म्हणजे स्वराज्य सोडून गुलामी. एवढे करून वडिलांवरचे संकट दूर होईल, याची कोणतीही शाश्‍वती नव्हती. अर्थात् राजांनी पहिला पर्याय स्वीकारला. राजांनी लढण्याचा निर्णय घेतला.येथेच कूटनितीज्ञ म्हणून शिवरायांची चुणूक दिसली.
कौटिल्याने युद्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत – विक्रमस्य प्रकाशयुद्धं, कूटयुद्धं, तूष्णीयुद्धम्. या तीन युद्धांपैकी राजांनी, भीतीने गाळण उडवणे, अचानक आक्रमण करणे, गैरसावध अथवा संकटात असता झोडपणे, एका ठिकाणी माघार आणि उलट परतून आक्रमण या डावपेचांनी युक्त अशा कूटयुद्धाची निवड केली. कारण  राजांसाठी प्रकाशयुद्धाचा पर्याय नव्हताच, कारण सैन्य तुटपुंजे होते. फतेखानची मोहीम नक्की झाल्यावर आदिलशहाने उत्रावळीच्या केदारजी खोपडेला फर्मान पाठवले होते. त्यात स्पष्टच लिहिले होते, फतेखान खुदावंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्माविली आहे. तरी हे फर्मान पोचताच त्याने स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन त्याच्या आज्ञेत राहून दिवाणाची मसलत करावी.. थोडक्यात त्या तुटपुंज्या सैन्यालासुद्धा फोडण्याचा प्रयत्न झालेला. केदारजीचे फर्मान हे केवळ वानगीदाखल. ऋतुमानाचा विचार करायला वेळच नव्हता, कारण युद्ध शिवाजी महाराजांनी आरंभले नव्हते. त्यामुळे शत्रूचा सामना करणे एवढी एकच गोष्ट राजांच्या हातात होती. आता प्रश्‍न उरला तो फक्त अनुकूल भूमीचा आणि राजांनी ती अनुकूल भूमी हेरली. या वेळी राजांचे राज्य होते ते पुणे, इंदापूर, सुपे आणि काही मावळ भाग. कोंढाणा, तोरणा आणि राजगड हे किल्ले. सर्व मिळून आठशे गावे आणि थोडीफार शहरे. राजांनी निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या तळहाताएवढ्या स्वराज्यात शत्रूला प्रवेश करू द्यायचा नाही. या युद्धासाठी शत्रूच्याच भूमीचा उपयोग करायचा आणि राजांनी निवड केली पुरंदर गडाची.
पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर होता. सासवडपासून सहा मैल पश्‍चिमेला डोंगराळ मुलुख, तर पूर्वेला सपाट मैदान, वायव्येला तेरा-चौदा मैलांवर सिंहगड, पश्‍चिमेला एकोणीस-वीस मैलांवर राजगड, असा पुरंदर होता. या तीन किल्ल्यांच्या मधला प्रदेश डोंगराळ असल्याने शत्रूला आत शिरणे कठीण, किल्ला मोठा आणि मजबूत. त्यामुळे गडावर मोठी शिबंदी राहू शकते. गडाची पश्‍चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू दुर्गम. सर्वार्थाने किल्ला योग्य होता; पण अडचण अशी की, तो शत्रूच्या कह्यात होता. तरीसुद्धा जमेची बाजू म्हणजे पुरंदरचे किल्लेदार महादजी नीळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजे यांचा जुना स्नेह होता. त्यातच सरनाईक आता वृद्ध झाले होते आणि त्यांच्या चार पुत्रांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. या परिस्थितीचा लाभ घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला; पण कह्यात घेतला नाही. म्हणजे किल्ला अजूनही शत्रूच्याच कह्यात होता. याचा अर्थ शत्रूची भूमी शत्रूशीच लढण्यासाठी राजांनी वापरली. केदारजीच्या पत्रावरून स्पष्ट होते की, खानाला आदिलशहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले होते; पण राजे असे अचानक पुढे आल्यामुळे फतेहखानाला आपला विचार पालटावा लागला. कोंढाण्याकडे जाण्याऐवजी त्याने बेलसरजवळ मुक्काम केला. साधारणपणे ऑक्टोबर १६४८ ला खान तेथे पोचला असे मानले जाते. खान असेच करेल ही अटकळ राजांनी बांधली होती. आता राजांच्या कूटयुद्धाला प्रारंभ झाला. छावणी पडल्याबरोबर खानाने राजांच्या शक्तीचा अंदाज घ्यावा आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा; म्हणून बाळाजी हैबतरावाला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले. खान स्वराजाच्या दिशेने निघाला असतांना राजांनी हा छोटा किल्ला घेतला होता. खानाच्या या योजनेमुळे त्याचे सैन्य विभागले गेले. म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ला लढवलाच नाही. कौटिल्याच्या सूत्रानुसार त्यांनी आपले बल किंवा सैन्य दूष्य असल्याचे भासवले आणि त्याच वेळी जितम् असा विश्‍वास खानाच्या मनात निर्माण केला. बाळाजीने हा किल्ला सहज जिंकला. खानाला विजयाचा आनंद देऊन बेसावध करण्यासाठी हा किल्ला सोडून दिला गेला. किल्ला सहजपणे हाती आल्यामुळे बाळाजी आणि त्याचे सैन्य या पहिल्या यशाने आनंदित झाले होते. शिवाजी महाराजांच्या नीतीचा त्यांना अंदाजच आला नव्हता. एकत्र त्यागघातौ म्हणजे एकाच वेळी माघार आणि परतून हल्ला या कूटयुद्धातल्या दुसर्‍या खेळीला राजांची सुरुवात झाली. खान बेसावध झाला, पण अविश्‍वस्त किंवा सावध राजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी ओणि भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गढी घ्यायला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी सत्र म्हणजे दबा धरून बसली. पहाटे शत्रू गाफील असतांना या सैन्याने आक्रमण केले. अशा आक्रमणाची कल्पनाच कोणी केली नव्हती. बाळाजीने गढीचा दरवाजा लावून घेतला; पण आदिलशहाच्या कारकीर्दीत कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता. मावळ्यांनी कोट खणायला प्रारंभ केला. काही जणांनी शिड्या चढायला प्रारंभ केला. बाळाजीच्या सैन्याने दगड, गोटे, पलिते मिळेल त्याने प्रतिकार करायला प्रारंभ केला; पण मराठे इरेला पेटले होते.  बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने वेस फोडली. मराठ्यांचा आवेश पाहून हैबतरावाचा आणि सैन्याचा धीर सुटू लागला. शेवटी कावजीने हैबतरावाला ठार केले, हैबतरावाचे सैन्य शरण आले. शिरवळवरील लूट पुरंदरावर आली.
राजांनी एक तुकडी शिरवळवर पाठवली, त्याच वेळी दुसरी तुकडी फतेखानच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली. याचे नेतृत्व बाजी पासलकर करत होते. थोड्या वेळात फतेखानच्या सैन्याने कडवा प्रतिकार आरंभला. खानाच्या सैन्यापुढे राजांचे सैन्य अगदीच तुटपुंजे होते. बाजीच्या सैन्याची हानी होऊ लागली. या झटापटीत निशाणाची तुकडी फतेखानाच्या सैन्याच्या तावडीत सापडली. ते पाहून बाजी जेधे पुढे सरसावला. निशाणाचा भाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन तो परत फिरला. त्याच्या मागोमाग सारे सैन्य परतले. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे आणि सैन्य परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले. शिरवळ आणि बेलसर अशा दोन्ही ठिकाणी या पोराने आपला पराभव केला या कल्पनेने संतापलेल्या फतेखानाने पुरंदरावर आक्रमण केले. राजांचे सैन्य किल्ल्यात वरच्या बाजूला होते. त्याचा फायदा घेऊन फतेखानाचे सैन्य मार्‍याच्या टप्प्यात आल्यावर वरच्या दिशेने दगड, बाण यांचा मारा चालू झाला. सैन्य या मार्‍याने आणि वर चढण्याने दमलेले असतांना राजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला अन् ताज्या फौजेला बाहेर काढले. फार मोठी हातघाई झाली. गोदाजीने मुसेखानाच्या छातीत आपला भाला घुसवला. खानही अतिशय पराक्रमी होता. त्याने तो बाहेर काढला आणि त्याही परिस्थितीत तलवारीने लढू लागला. पण गोदाजीच्या वाराने मुसेखान खांद्यापासून मध्यभागपर्यंत चिरला जाऊन गतप्राण झाला. मुसेखानाची अवस्था पाहून फतेखानाचे सैन्य घाबरले आणि पळत सुटले. अत्यंत उत्साहात असणार्‍या मराठ्यांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला. यात बाजी पासलकर ठार झाले; पण स्वराज्याची पहिली लढाई पूर्णपणे यशस्वी झाली. एकीकडे फतेखानला तोंड देतांना शहाजीराजांच्या सुटकेसाठी राजांनी संधीचा विचार केला. ल्यबळ आणि बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी विग्रह. राजे हीच खेळी खेळले. तुलनेने कमी शक्तीशाली आदिलशहाशी राजांनी लढाई केली आणि सामर्थ्यशाली दिल्लीशी संधी. त्यांनी गुजराथचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशहाला एक विनंतीअर्ज पाठवला. त्यात त्यांनी मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी आदिलशहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी, अशी विनंती केली. राजांचा हा अर्ज मान्य झाला. शहाजीराजांच्या अटक प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा सरदार मुस्तफाखान त्याच वेळी मेला. त्यामुळे आदिलशहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.
कूटनितीज्ञ म्हणून महाराज यशस्वी ठरल्याचा दुसरा प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. 'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, 'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.' खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी, पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खिरदुर्ग (सागरगड), मानगड.
या तहानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले आणि आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कूटनीतीमधील परमोत्कर्ष बिंदू इतिहासात आपल्या सर्वांना विदीत आहेच. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या या तीन महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार होता हा किल्ले पुरंदर.
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत. 1) बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'. 2) पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 3) रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्या च्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो. 4) दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. 5) खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो. 6)  पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते. 7) शेंदर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्‍या बुरूज. 8) केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे. 9) पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात. 10) भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. 11) वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणार्‍या सासवड या गावी यावे लागते. सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे.येथे जाताना कोणतेही आयडी कार्ड घेऊन जावे (आधार ,पँन कार्ड, मतदान ओळखपञ इत्यादी) जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.
पुरंदर किल्ल्यावर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात फुल फूलतात. सप्टेंबर २०१३ मध्ये ट्रेक क्षितिज संस्थेने ८४ फुलांची नोंद केली यात काही दुर्मिळ फुल तर काही केवळ पुरंदरवर आढळणारी फुल आहेत. सध्या पुरंदर व वज्रगड हे किल्ले भारतीय सैन्याच्या ताब्यात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो. वज्रगड किल्ल्यावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.
(संदर्भ - दुर्गदर्शन - गो.नी.दांडेकर,  शिवाजी हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स, ग. भा. मेहेंदळे)



योगेश शुक्ला (जळगाव)

जंजिर्‍याच्या सिद्दीला जमीनीवरील शह - सामराजगड



जंजिरा किल्ला हा हबश्यांच्या ताब्यात होता. या हबश्यांचा किनाऱ्यावरील रयतेला खूपच उपद्रव पोहोचत असे. लुटालुटी बरोबरच किनाऱ्यावरील गावांमधून बायकांमुलांना पळवून नेवून त्यांचे धर्मांतर करणे अथवा गुलाम म्हणून अरब देशात विकणे असे उद्योग सिद्दीचे चाललेले असत. जंजिऱ्याच्या सिद्दीबाबत शिवकालीन कागदपत्रामधे एक उल्लेख येतो. जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे स्वराज्यांला लागलेला उंदीर. या उंदराचा समुळ नायनाट करण्याचा महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले पण त्यात यशाने नेहेमीच हुलकावणी दिली. सिद्दीच्या या जाचाला आळा घालण्यासाठी आणि त्याच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरात पद्मदुर्गाची तर किनाऱ्यावर सामराजगडाची उभारणी केली.
हा किल्ला त्याकाळी दंडाराजपुरीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. जंजिऱ्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे. सामराजगड बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना फौजेनिशी पाठविले. त्यांनी सिद्दीचा दंडाराजापूरीच्या आसपासचा मुलुख ताब्यात घेतला. सिद्दीने हबशी घोडेस्वार मराठ्यांवर पाठविले. या युध्दात ३०० हबशी मारले गेले. सिद्दीने महाराजांशी तहाची बोलणी केली, पण महाराज बधले नाहीत राजापूरीजवळ जिंकलेल्या डोंगरात महाराजांनी सामराजगड बांधला. सामराजगड बांधल्यापासून तो सिद्दीच्या डोळ्यात खुपत होता.

तो घेण्यासाठी सिद्दीने आपले निवडक सैनिक होडीत बसवून किनाऱ्यावर उतरविले. त्यांनी सामराजगडा भोवतीच्या माडांच्या झाडांना तोफा बांधून किल्ल्यात मारा केला, पण तोफा झाडावरुन खाली पडून सिद्दीचेच नुकसान झाले. ११ फेब्रुवारी १६७१ हा होळीचा दिवस होता. जंजिऱ्याच्या मोहिमेसाठी महाराज रायगडावरुन निघाले होते. त्यांचा मुक्काम रायगडापासून ९ कि.मी.वर होता. या मोहिमेपूर्वी सिद्दीने सामराजगड जिंकण्याचा बेत आखला. रात्रीच्या गडद आंधारात सिद्दी कासिम होड्यांमधून आपले सैन्य घेऊन बाहेर पडला व सामराजगडाच्या पायथ्याशी उतरला. त्यांनी तटाला शिड्या, दोरखंड लावले. याच वेळी जमिनीच्या बाजूने सिद्दी खैरत आपल्या ५०० हबशी सैनिकांनिशी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आला. त्याने होळीच्या रंगात बेसावध असलेल्या मराठ्यांवर जोरदार हल्ला केला. त्यांना सावरायला वेळही मिळाला नाही. तरीही नेटाने मराठे सिद्दी खैरतवर तुटून पडले. या संधीचा फायदा घेऊन सिद्दी कासिमने आपले सैन्य दुसऱ्या बाजूने किल्ल्याच्या तटावर चढविले. सिद्दीच्या या दुहेरी हल्ल्यामुळे मराठी सैन्य विभागले गेले. तरीही मराठे प्राणपणाने लढत होते, इतक्यात दारु कोठाराचा स्फोट झाला. त्यात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक ठार झाले व सामराजगड सिद्दीच्या ताब्यात गेला. मध्यरात्री झालेल्या स्फोटाच्या आवाजाने शिवाजी महाराज जागे झाले. त्यांनी आपले जासूद ताबडतोब सामराजगडाकडे रवाना केले. सामराजगडाची बातमी कळल्यावर शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहिम रद्द केली.
सामराजगडाला जाण्यासाठी आपल्याला प्रथम मुरुडला पोहोचावे लागते. मुरुड हे गाव शहरांना गाडीमार्गाने जोडलेले आहे. सामराजगड उर्फ दंडाराजपुरी किल्ला हा छोटासा किल्ला मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळील टेकडीवर अवशेषरुपात शिल्लक आहे. एकदरा गांवातल्या शिवमंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनाऱ्याचा सुंदर देखावा दिसतो. इथुनच चढाईला सुरुवात करायची. या वाटेने १० मिनीटात सामराजगडावर पोहोचता येते. वर चढतांना वाटेत काही भग्न अवशेष दिसतात. गडाच्या समुद्राकडील बाजुस एक कोरडा पडलेला बांधीव तलाव दिसतो. सामराजगडाच्या बालेकिल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. दगड एकमेकांवर नुसते रचून ही तटबंदी बनविण्यात आली होती. तटबंदीमध्ये असणारे पाच बुरुज आजही दिसून येतात. गच्च वाढलेल्या झाडीत थोडीशी शोधाशोध केल्यावर दोन चौथरे दिसून येतात. सामराजगडावरुन जंजिरा व पद्मदुर्ग या जलदुर्गांबरोबर मुरुड परिसराचा मस्त देखावा दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. बाकी जास्त अवशेष नसले तरी सामराजगडाची इतिहासाने मात्र नोंद घेतलेली आहे.

Friday, June 29, 2018

आश्‍चर्यकारक वास्तूकलेचा विजयदुर्ग


विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1193 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.
वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूने जमिनेने वेढलेल्या "घेरीया" उर्फ़ "विजयदुर्ग" किल्ला उभा आहे. . इ.स. १८ ऑगस्ट १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकयॉरने स्पेक्ट्रा मीटरच्या साह्याने केलेल्या निरीक्षणातून सूर्यकिरणातील पिवळ्या रंगातील हेलियम गॅसचा शोध १८ ऑगस्ट १८९८ रोजी याच किल्ल्यात लावला होता, या घटनेची नोंद जगभर घेतली गेली. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठी जहाज (युध्द नौका) आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे.
इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला.

मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.
१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा! दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या
मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.
या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान, ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!… शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.

ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे. या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे आंग्रेंशी कधीच जुळले नाही. आंग्रेंच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागात असलेल्या गोदीवाडी येथील आरमारी गोदी कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.
साधारण ६० वर्षापूर्वी म्हणजेच १९५२ सालात आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर सापडला होता. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेल्या या नांगरावरून त्या वेळच्या जहाजांची कल्पना येते. याच आरमारी गोदीमध्ये शत्रूंच्या जहाजांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन जहाजेही बनवली जात. गिर्ये गावाजवळ वाघोटन खाडीच्या काठावर खडक खोदून या गोदीची निर्मिती आंग्रेंनी केली. या गोदीची लांबी ३५५ फूट व रुंदी २२७ फूट इतकी होती. या गोदीमध्ये ५०० टनी जहाज सहज ये-जा करत. भरतीच्या वेळेमध्ये जहाजे गोदीत नेण्यात येत असत. ओहोटीला गोदीतील पाणी बाहेर गेल्यावर पूर्वेकडील ३७ फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडविले जाई. त्या वेळी तीनशेहून अधिक कामगारांनी प्रचंड परिश्रम करून ही गोदी निर्माण केली. प्रसिद्ध फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीचं महत्त्व एवढं मोठं होतं की, या गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठय़ांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या. अर्थात, या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. या गोदीची पाहणी करत असताना १९५२ सालात कॅप्टन डेव्हिस यांना चिखलात रुतलेला नांगर सापडला. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेला हा नांगर १८व्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियममध्ये तो नांगर आजही जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी हा नांगर संग्रहालयाकडे पाठविला अशी नोंद आढळते.
विजयदुर्गचे बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळय़ात सतत खुपत असे. त्यासाठी काळोखी रात्र धरून अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन मजबूत युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर असताना त्या युद्धनौका बुडाल्या. याचा शोध घेताना त्या भागात समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या असा निष्कर्ष काढता येतो. या संदर्भात काही तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. विजयदुर्गजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ मध्ये शोधप्रबंध सादर केला होता. त्यानंतर या संस्थेतील या प्रबंधाला समोर ठेवून मुंबईमध्ये भरलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजमध्ये संशोधक सहायक असलेल्या इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांनी ‘मिथ्स अँड रिअ‍ॅलिटी-दी सबमज्र्ड स्टोन स्ट्रक्चर अ‍ॅट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की, विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे.
कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणा-या ‘डाइक’ या प्रकारच्या रचनेचाच हा एक भाग असल्याचे ते म्हणतात. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणतात की, हे बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ बाय २.५ बाय २.५ मीटर इतक्या मोठय़ा आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते. साधारण ८० ते ९० वर्षाच्या या इतिहासात किरकोळ घटना वगळता या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. काही असलं तरी मराठय़ांच्या आरमारात पाण्याखालील ही भिंत आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. कारण पूर्ण तयारीनिशी आणि गुप्तपणे उतरलेल्या इंग्रजांच्या ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ वेळी ही भिंत कामी आली नसती तर कदाचित विजयदुर्गला एका पराभवाचा ठपका बसला असता. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठय़ांच्या पराक्रमात कामी आली आहे. हा भाग नैसर्गिक आहे. पण ही जागा आंग्रेंच्या नौदलाने शोधून काढली आणि त्याचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतविण्यासाठी अनेक वेळा केला.
जमिनीवर जशा द-या-खो-या, उंचवटे, टेकडय़ा असतात, त्याचप्रमाणे समुद्रतळाशीही असा भाग असतो. समुद्रातील टेकडी म्हणजेच ‘आंग्रे बँक’! किनारपट्टीपासून आपण आत आत गेल्यावर पाण्याची खोली वाढत जाते. विजयदुर्ग समुद्रामध्ये मात्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. विजयदुर्गपासून साधारण १०० किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ८० ते ९० मीटर वाढत जाते. पुढच्या ३ ते ४ किमीच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी जाते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये ही खोली अचानक कमी होऊन २० ते २५ मीटर एवढी होते. हीच ती आंग्रे बँक म्हणून ओळखली जाणारी समुद्रातील टेकडी! ही टेकडी तब्बल ३५ ते ४० किमी लांब व १५ ते २० किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणा-या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडं विजयदुर्गकडेच असत. या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असत. या गोष्टीचा फायदा मराठा आरमार घेत असे.
आंग्रे बँक या ठिकाणी मराठा आरमार नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की, मराठय़ांची जहाजं पश्चिमेकडून येऊन त्यांना अटकाव करत. बेसावध असलेल्या शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत. पराक्रमी मराठा सरदार, त्यांचे मावळे यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला बांधलेली तिहेरी तटबंदी मराठय़ांच्या पराक्रमात महत्त्वपूर्ण ठरली. आणि याचबरोबर आरमारी गोदी, समुद्रातील छुपी तटबंदी, आंग्रे बँक या गोष्टीही विजयदुर्गवरील मराठय़ांच्या विजयगाथेत अतिशय मौल्यवान कामगिरी करणा-या ठरल्या.
सुमारे आठ हेक्टर (५ चौ. किंमी.) क्षेत्रफळाच्या या किल्ल्याला त्रिपदरी तट, सत्तावीस बुरूज व तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य द्वाराच्या आतील बाजूस जुन्या कोठाराची इमारत असून तिची डागडुजी करून विश्रानधामात रूपांतर करण्यात आले आहे. त्याच्यासमोर पोलिसांकरिता निवासस्थाने बांधलेली आहेत. विश्रामधामाजवळच जीर्ण अवस्थेत एक जुना तलाव असून त्याजवळ मत्स्योत्पादन केंद्र/मासे खारविण्याचे केंद्र आहे. या वास्तूसमोरच लॉकियर या पाश्चात्त्य ज्योतिर्विदाने १८९८ मध्ये ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी बांधलेले सिमेंटचे कट्टे आहेत. किल्ल्यात चार लहान मंदिरे आहेत. यांशिवाय परिसरात नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी बांधलेले रामेश्वर मंदिरे असून समामंडपाबाहेर दीपमाळ आहेत. गाभाऱ्यात शिवपिंड आणि बंदिस्त खोलीत पन्नास किलो वजनाची चांदीची वृषबारूढ चतुर्भुज शिवमूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस आवाराबाहेर आंग्र्यांची एक छत्री व सतीची शिळा आहे. धान्य कोठाराची इमारत अजूनही सुस्थितीत आहे. धान्य कोठाराच्या छतासाठी दगडी कमानींचा (व्हॉल्ट) रचनेचा वापर केला आहे. तसेच धान्य अधिक काळ टिकून राहण्यासाठी खेळती हवा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणून खिडक्यांची व्यवस्थाही उत्तम प्रकारे केली आहे. दारूगोळा कोठाराची खूपच पडझड झाल्यामुळे फारशी कल्पना येत नाही. अडीअडचणीच्या काळात किंवा अपघातसमयी आग विझवण्यासाठी कोठाराजवळ पाण्याचा साठा असावा, म्हणून हौदाची व्यवस्था केलेली असावी! हा आयताकृती हौद दगडात बांधला असून, तो साधारणत: सत्तर फूट लांब, ऐंशी फूट रुंद आणि वीस फूट खोल आहे. साधारणत: एक लाख घनफूट पाण्याचा साठा होतो. हौदात उतरण्यासाठी दोन्ही दिशांना दगडी पायऱ्या आहेत. जमिनीत पाणी झिरपू नये म्हणून तळभागात फरशीकाम केल्याचे दिसून येते. किल्ल्याजवळ एक दीपगृह आहे. परिसरत दोन माध्यमिक शाळा आहेत. येथे शिंगाच्या वस्तू बनविण्याचा छोटा उद्योग तसेच वाघोटन नदीत मच्छेमारीचा व्यवसाय चालतो.
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे.नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गे हि जाऊ शकतो. रत्नागिरी,पावस,जैतापूर,कात्रादेवी,पडेल कॅन्टीन मार्गे रत्नागिरीहून विजयदुर्गला २ तासात पोहचता येते. ह्या नव्या सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग येथे पोहचण्याचे ३ तास वाचले आहेत.तेव्हा ह्या मार्गाचा हि पर्यायी मार्ग म्हणून वापर करू शकता.आणि समुद्रकिनारी सर्व गावांचे आणि निसर्गाचे दर्शन घेत आपण विजयदुर्ग येथे पोहचाल.विजयदुर्ग हे समुद्रामार्गी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील बाजूस राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा आणि शिरसे गावाची खाडी हि दिसते.
विजयदुर्ग येथे एसटी आगार असून येथे दिवसाकाठी मुंबई ला जाण्यासाठी २ बसेस आहेत तर पुण्याला जाण्यासाठी १.आणि दर एक तासाने देवगड इथे जाण्यासाठी हि बसेस आहेत . तालुक्याचे ठिकाण  : देवगड बाजारपेठ पडेल कॅन्टीन , तालुका:देवगड जवळील रेल्वे स्थानक : कणकवली रेल्वे स्थानक ८० किमी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ७५ किमी
(योगेश शुक्ला, जळगाव)

किल्ले विशालगड


घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरील पहारेकरी - विशालगड
इथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा
इथेच फुचली छाती , परी ना दिमाख हरला जातीचा।
आठवण येता अजुन येतो, खिडीचा दाटून गळा।
विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।।
केशव पंडित आपल्या राजाराम चरितम् काव्यात म्हणतात, विशाळगडी दुर्गही सांप्रत विद्यते तव । अत्रापि दुर्ग सामाग्री परिपुर्णेन भाति मे ।। यावरूनच गडाचे नाव विशाळगड आहे हे समज उमगते . पण काही कागदात व शिलालेखात यास खिला खिला, खिला गिला खेळणा असेही म्हटले आहे. शिवराजांनी या गडास विशाळगड हे नाव दिले.
कोकणात शत्रूला घाटमाथ्यावरून उतरता येऊ नये व कोकणात शत्रूला पाय रोवता येऊ नयेत म्हणून विविध गडांची उभारणी महाराजांनी केली होती. याचप्रमाणे महाराजांनी लढायांसाठी व सैनिकांच्या विश्रांतीसाठीही गडांची उभारणी व युद्धाद्वारे गड काबीज केले होते. याचप्रमाणे महाराजांनी मुस्लीम सत्ताधा-यांकडून हा विशाळगड जिंकून घेतला होता. उंच आणि अवघड ठिकाणी उभारण्यात आलेल्या विशाळगडाचे महत्त्व शिवाजी महाराज पन्हाळागडाचा वेढा फोडून या गडावर सुरक्षित पोहोचले त्याचवेळी स्पष्ट झाले. तरीही शिलाहारांनी अत्यंत दूरदृष्टीने या गडाची उभारणी केली होती. ऐतिहासिक काळात विशाळगडावरून आंबा, मलकापूर, अणुस्कुरा, राजापूर तसेच सिंधुदुर्गापर्यंत तसेच तळकोकणात साखरपा, गणपतीपुळे, रत्नागिरीपर्यंतच्या भागावर देखरेख ठेवली जात असे.
कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम सरहद्दीवर बसलेला हा विशाळगड.समुद्र सपाटीपासुन याची उंची ३३०० फूट आहे. कोल्हापूर ते विशाळगड हे अंतर ८६ कि.मी. आहे. कोल्हापूरहून जाताना वाटेत पन्हाळगड दिसतो आणि सह्याद्रीचा जो फाटा सुरू होतो तो थेट मलकापूरपर्यंत आपल्या संगती राहतो. या फाट्यावरील अनेक लहान मोठे डोंगर, मन आकर्षित करणा-या द-या, त्यातून वसलेली छोटी छोटी गावे सारेच विलोभनीय. गडावर जाण्यास पूर्वेकडून एक आणि पश्चिमेकडून दुसरी वाट आहे. नावाप्रमाणेच गड विशाल आहे. याची लांबी व रूंदी ३२००, १०४० फूट आहे. येथे वार्षिक पाऊस सरासरी २५० ते ३०० इंच पडतो. गडाच्या परिसरात मात्र एकही मोठे गाव नाही. गडावर जी घरे आहेत त्यांनी कोणत्याही कामासाठी मलकापूरलाच यावे लागते. या गडावर राजा दुसरा भोज पासुन ते १८४९ पर्यंत बरीच मोठी उलाढाल झाली. इतकेच नव्हे तर राजाराम महाराज चंदीस जाताना महाराष्ट्राची राजधानी विशाळगड हीच होती.
विशाळगड बांधणीचे श्रेय शिलाहार वंशीय दुसरा भोज राजा यास जाते. विशेषत कोल्हापूरचे शिलाहार हे या भागात अधिक अग्रेसर होते. यातील वर उल्लेख केलेला दुसरा भोज प्रारंभी चालुक्यांचा सामंत होता. तो स्वतःला महामंडळेश्वर असे म्हणवीत होता. याचवेळी चालुक्यांची सत्ता गुंडाळत आली होती व ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याची ते अखेरची धडपड करीत होते. या सर्व परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचे मनाशी ठरवून, पध्दतशीरपणे सह्याद्रीच्या या भागातील शिखरांची परीक्षा घेऊन भोजाने जागोजागी गड उभारले व या गडांच्या आश्रयाने आपले स्वतःचे सामर्थ्य वाढवले. तसेच चालुक्यांच्या सामंत शाहीची झूल झुगारून देऊन राजधिराजे व पश्चिम चक्रवर्ती ही बिरूदे त्याने धारण केली.

विशाळगड व कोल्हापूर हा भाग रठ्ठे महारठ्ठे यांच्या ताब्यात होता. इ. स. ९७३ पर्यंत राष्ट्रकूटांची येथे सत्ता चालू होती. त्यांना जिंकून पुन्हा चालुक्य, शिलाहार, यादव, मराठे, पालेगार, अदिलशहा, शिवछत्रपती असे अनेक राजे व त्यांचे काल या गडाने पाहिलेत. किल्ल्याचे बहुतेक बुरूज आणि तटबंदी ढासळलेली असून गडावरील स्थळांची देखील तीच अवस्था झाली आहे. किल्ल्याचे जुने वैभव जरी नष्ट झाले असले तरी नैसर्गिंक सौंदर्य मात्र टिकुन आहे. राजापूरकडील दर्शनी बाजू सोडली तर किल्ल्याच्या इतर सर्व बाजूंनी खोल द-या आणि सह्याद्रीच्या प्रचंड दाट व विक्राळ सोंडा यांचा गराडाच पडल्याचा भास होतो. हा किल्ला रहदारीच्या मार्गापासुन १२ मैल आत जंगलभागात आहे.
अफझलखान वधानंतर महाराजांनी मोठी मोहीम सुरु केली आणि आदीलशाहीचा बराच मुलूख जिंकला.त्यांचे पारीपत्य करण्यास आदीलशहाने सिद्दि जौहरची नेमणुक केली आणि मोठ्या फौजेसह त्याला रवाना केले.सिद्दीने महाराज पन्हाळ्याला असताना गडाला वेढा दिला. त्यावेळच्या युद्धशास्त्रानुसार हा वेढा फारतर पावसाळ्यापर्यंत टिकेल आणि मग सिद्दी माघार घेईल असे महाराजांना वाटत होते. पण सिद्दीने पावसाळ्यातही वेढा कायम ठेवला. बाहेरुन वेढा फोडायचे नेताजी पालकरांचे अनेक प्रयत्न सिद्दीच्या सावधगिरीने फसले.गडावरही फार मोठी कुमक नव्हती. अखेर राजांनी निवडक मावळ्यांसह विशाळगडावर पळुन जायचे ठरवले.आषाढ पौर्णिमेचा दिवस ठरला.रात्री किर्र अंधारात आणि पावसात ६०० मावळे घेउन राजे पुसाटी बुरुजाकडुन मसाईच्या पठारावर उतरले आणि वेढ्यातुन निसटुन विशाळगडाच्या मार्गाला लागले.पण खानाला याची कुणकुण लागली आणि त्याने मोठी फौज देउन सिद्दी मसुदला राजांच्या मागावर पाठवले. सिद्दीने राजांना गजापूरजवळ घोडखिंडीत गाठले आणि लढाईला तोंड फुटले.
६०० मावळ्यांचा एव्हढ्या मोठ्या सैन्यासमोर निभाव लागणे शक्यच नव्हते. शेवटी लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहीजे या नियमानुसार बाजीप्रभू देशपांड्यांनी राजांसमोर एक प्रस्ताव ठेवला.राजांनी ३०० मावळे घेउन पुढे कूच करायचे आणि ३०० मावळ्यासह बाजींनी खिंड थोपवुन धरायची.बाजींना खुण म्हणुन राजांनी विशाळगडावर पोचल्यावर तोफ उडवायची असे ठरले आणि मग पावनखिंडीत घोर रणसंग्राम माजला."तोफेआधी मरे न बाजी सांगा म्रुत्यूला" अश्या आवेशाने बाजीप्रभू खिंडीत लढले आणि तोफ ऐकल्यावर ३०० मावळ्यांसह त्यानी प्राण सोडले. या अतुलनीय शौर्याला सलाम म्हणुन अनेक ट्रेकर मंडळी हा ट्रेक १० ते १२ जुलै दरम्यान करत असतात.
विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी असून जवळच त्यांचे बंधू फुलाजी यांचे वृंदावन आहे. हजरत पीर मलिक रैहानचा दर्गा हे गडावरील आणखी एक ठिकाण मलिक रैहान नावाच्या साधूचे स्मारक आहे. दर्ग्याची इमारत जुनी असुन इ. स. १६३९ मध्ये राजापूर येथील एक धार्मिक व्यापारी कोर्डूशेठ बल्लार यांनी विशाळगड संस्थानकडे एक मोठी देणगी देऊन या जुन्या इमारतीचा जीर्णोध्दार करविला.
सध्या दगडावर असलेली कमान पडक्या स्थितीत आहे. गडावर असणा-या मलिक रेहान या दर्ग्यावर नवस बोलण्यासाठी असंख्य भाविक येत असतात. गडावर पाण्याची मोठी टंचाई असून पायथ्याजवळून गडावर पाणी न्यावे लागते. गडावर येणा-या पर्यटकांना राहण्यासाठी सध्या निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. अमृतेश्वर हे शंकराचे देवालय. अमृतराव प्रतिनिधी यांनी इ. स. १७५१ ते १७६२ मध्ये बांधले. देवालयासमोर पाण्याची छोटी कुंडे आहेत. गडाची वरची चढण संपताच सपाटीला असलेल्या टेकडीसारख्या चौथ-याला रणमंडप म्हणतात. भोज राजाने जेव्हा भूपाल तळे बांधले तेव्हा त्यातील माती काढून हा चौथारा तयार केला. गडावरील लढाया याच ठिकाणी झाल्यामुळे त्यास रणमंडप असे नाव प्राप्त झाले आहे. हा भाग इंचावर असल्यामुळे सुर्यास्ताच्या वेळी समुद्राचे अत्यंत विलोभनीय दर्शन येथून घडते. मुंढा उर्फ चोर दरवाजा हे आणखी एक ठिकाण येथून पुढे जाण्यास वाट नाही. मात्र टेहळणी करता येते. कै. राजाराम महाराज हे इ. स. १७०० मध्ये सिंहगडी कालवश झाले. त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई त्यांच्या पागोट्यासह सती गेल्या. त्या साध्वीचे येथे वृंदावन आहे. त्याला सतीचे वृंदावन असे म्हणतात. गडावर सती गेलेल्या ५२ स्त्रियांची वृंदावने बावनसती म्हणून ओळखली जातात. देहांत शासन देण्यासाठी येथे टकमक कडा आहे.याशिवाय रामचंद्र निळकंठ यांनी बांधलेला वाडा आहे. अष्टमीच्या चंद्राच्या आकारातील अर्धचंद विहीर श्री भगवंकेश्वर,नरसोबाचे मंदीर,गौरीचे तळे, वोडणीचा मळा ,पाताळनगरी,डिकमाळ गंजीचा माळ,तास टेकडी वगैरे प्रेक्षणीय स्थळेही गडावर आहेत. या गडाच्या डोंगरभागावर गवेरेडे जवळून पाहायला मिळतात. गडाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा मार्ग आंबा या गावातून आहे. हा रस्ता गडाच्या पायथ्यापर्यंत जातो. विशाळगड व रस्त्याचा भाग यांच्यामध्ये मोठी दरी असून यांना जोडणारा लोखंडी साकव उभारण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना या लोखंडी पुलामुळे गडाकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या गडावर माकडेही मोठया प्रमाणात दृष्टीस पडतात, मात्र त्यांचा पर्यटकांना कोणताही त्रास होत नाही. या गडाकडे पायथ्यापासून जाण्यासाठी पाखाडी व त्याला दरीच्या बाजूने रेलिंगही उभारण्यात आले आहे. यामुळे गडाचा परिसर सुरक्षित झाला आहे.
गडावर मलिक रेहान दर्ग्याच्या अवतीभवती छोट्या मोठ्या भरपूर खानावळी व हॉटेले असू तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध होऊ शकते. गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असून ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते. गडावर येणा-या पर्यटकांना राहण्यासाठी सध्या निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. पावसाळयामध्ये या गड परिसराला धुक्याची झालर पसरलेली असते. अगदी दुपारीही या भागात धुके पाहायला मिळते. गड अत्यंत उंचावर वसलेला असल्याने या गडावरून संगमेश्वर, लांजा व रत्नागिरीचा काही भाग उन्हाळयात पाहायला मिळतो व याचा पर्यटकही लाभ उठवतात.
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.
( संदर्भ - सांगाती सह्याद्रीचा, डोंगरयात्रा - आनंद पाळंदे, दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर, किल्ले - गो. नी. दांडेकर)

योगेश शुक्ला, जळगाव 

Thursday, June 28, 2018

किल्ला पद्मदुर्ग


अजिंक्य मुरुड जंजिर्‍यावर वचक ठेवणारा - पद्मदुर्ग
'पद्मदुर्ग माहीत आहे का ??'
'नाही'
'जंजिरा ??'
'हो तर.. अजिंक्य राहीलेला किल्ला ना.. शिवाजी राजेंना पण तो किल्ला जिंकता आला नव्हता..'
'गेला आहेस कधी ?'
'हो'
'मग त्या किल्ल्यावरुन समुद्रात दुर बेटावर अजुन एक किल्ला दिसतो तो पद्मदुर्ग'
' अरे हा.. तो छोटा किल्ला... आलं लक्षात.. पण तिथे तर पाहण्यासारख काहीच नाहीये अस गाइड सांगत होता..!!'
'तो कोणी बांधला आहे माहित आहे का ?'

'नाही.. पण जंजिरा सिद्दीने बांधलाय हे नक्की'
आणि अश्या प्रकारे अजिंक्य अशी ओळख असलेला 'जंजिरा' अजुनही अजिंक्यच राहीलाय.. अलिबागला कुठला किल्ला तर सगळ्यांना 'जंजिरा' हे नाव परिचित.. पण खुद्द शिवाजी महाराजांनी बांधलेला 'पद्मदुर्ग' मात्र दुर्लक्षित.. ! अजिंक्य अश्या "जंजिऱ्या" शेजारी किल्ला बांधणे हा विचारच किती मोठा आणि धाडसी आहे.
मुरुडचा 'जंजिरा'  हा सुट्टीमध्ये पर्यटकांची प्रचंड वर्दळ असणारा किल्ला.. या किल्ल्यावर गाईडची देखील सोय केली जाते नि मग या अवाढव्य किल्ल्यापैंकी मोजकाच भाग दाखवणार्‍या गाईडचे शब्द अंतिम मानून तो जे काय म्हणेल ते सत्य समजायचे.. ! त्या काळात सिद्दीने इंग्रजांच्या मदतीवर समुद्रात स्वतःची हद्द बनवून घेतलेली..आता तीच परंपरा हे गाईड फक्त जंजिर्‍याचे गोडवे गाउन चालू ठेवतात... मग पर्यटकदेखील हाच तो मराठ्यांना अगदी शिवाजी महाराजांना जिंकता न आलेला 'जंजिरा' पाहिल्याचा अभिमान बाळगतात.. !! पण याच जंजिर्‍याच्या सिद्दीला वचक बसावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात बांधलेल्या कांसा म्हणजेच पद्मदुर्गाकडे मात्र आपण सर्रास दुर्लक्ष करतो. आज त्याच किल्ल्याविषयी माहिती...

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कांसा ऊर्फ पद्मदुर्ग हा सागरी दुर्ग राजपुरी खाडीच्या मुखाजवळ जंजि-यापासून तीन कि.मी. वायव्येस आहे. मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर सतत नजर ठेवता यावी या हेतूने जंजि-याच्या पश्चिमेस ऐन समुद्रात एका लहानग्या बेटावर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग उभारला. उत्फुल्ल कमळासारखा आकार असल्यामुळे शिवरायांनी या दुर्गाचे नाव ‘पद्मदुर्ग’ असे ठेवले.
जंजि-याचे सीदी अत्यंत क्रूर व धर्माध होते. ते हिंदू जनतेवर सर्वच प्रकारचे अत्याचार करीत. इ.स. १६५५ नंतर अधिकारावर आलेल्या फतहखानाच्या कारकिर्दीत कांसा किल्ल्यावर मोरोबा सबनीस नावाचा गृहस्थ राहात होता. श्रावण महिन्यात जीवतीचे चित्र आणून पूजेसाठी भिंतीवर चिकटविले. सीदीस कोणीतरी कळविले की, सबनीस पिवळा कागद चिकटवून तुमच्या वाईटासाठी चेटूक करतो आहे. सीदीने सबनीसाला पकडून आणले आणि तोफेच्या तोंडी दिले. यावरून सीदी मंत्र-यंत्र राज्याभिषेकानंतर (इ.स. १६७४) चेटूक यावर किती विश्वास ठेवत होता हे दिसून येते. सीदीची राजधानी जंजि-याजवळ, त्यामुळे समुद्रात मराठय़ांचा किल्ला असणे सीदीस मानवणारे नव्हते, म्हणून तो या किल्ल्याच्या बांधकामात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या या मा-यात आणि अडथळ्यांमध्येही किल्ल्याचे बांधकाम सुरूच होते. हे काम सोपे नव्हते म्हणून शिवाजी महाराजांनी कांसा किल्ल्याच्या संरक्षणासाठी दर्यासारंग इब्राहिमखान व दौलतखान यांना त्वरित हुकूम पाठविले की, ‘आरमार घेऊन त्वरित कांसा बेटावरील लोकांना संरक्षण द्यावे.’
बेटाभोवती समुद्रात आरमार ठेवायचे म्हणजे मोठी रसद, अन्नधान्य, दारूगोळा व पैसा आवश्यक असल्याने महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळ्याने प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारासाठी लागणारी खर्चाची रक्कम व धान्याचा पुरवठा करण्याचा हुकूम दिला. जिवाजी विनायककडून आज्ञापालनात कुचराई झाल्याने दर्यासारंगास रसद न मिळाल्याने ही गोष्ट त्यांनी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचविली. त्यामुळे महाराजांनी दि. १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायकचे कानउघाडणी करणारे पत्र लिहिले. जिवाजी विनायकला दर्यासारंगास पैसा व रसद उपलब्ध करून देणे भाग पडले व पुढे पद्मदुर्ग किल्ला उभा राहिला. या सर्व बाबीत शिवाजी महाराजांची कर्तव्यदक्षता व उद्दिष्टांची चांगली कल्पना येते.
बरीच वर्षे खपून महत्प्रयासाने बांधलेल्या या किल्ल्याचा पहिला हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते याची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १०,००० फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली. लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंताने हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली.
शूर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला. हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोराच्या शिडय़ा कापून त्यांनी माघार घेतली. शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा पालखीचा मान म्हणून एक बोट लाय पाटलास बांधून दिली व तिचे नाव पालखी असे ठेवले. बोटीबरोबरच लाय पाटलास छत्री, निशाण, वस्त्रे व दर्याकिना-यांची सरपाटीलकी मोठय़ा सन्मानपूर्वक बहार केली.
दि. २८ एप्रिल १७०४ मधील पद्मदुर्गविषयी एक पत्र आहे, त्यानुसार मोरोपंत पिंगळे यांचा मुलगा नीळकंठ पिंगळे व परशुराम त्रिंबक यांनी बहिरो पंडित यांच्या वंशजांना पत्र लिहून कळविले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरे पद्मदुर्ग किल्ल्याच्या खर्चासाठी व देखभालीसाठी बहिरोपंडित प्रधान यांना दोन गावे नेमून दिली होती. कराराप्रमाणे ती गावे आता पद्मदुर्ग किल्ल्याच्या कारकुनाच्या स्वाधीन करावी आणि यात कोणतीही अफरातफर करू नये. यावरून दिसून येते की, महाराजांनी नुसता किल्ला बांधला नाही तर त्याच्या देखभालीचीसुद्धा व्यवस्था लावून दिली होती. नंतर हा किल्ला सीदीच्या ताब्यात गेला त्याआधी पद्मदुर्गचा हवालदार जनाजी पवार व मुजूमदार मल्हार नारायण चेऊलकर होता.
इ.स. १७३२ मध्ये पेशव्याने मुरूडला वेढा घातला त्यावेळी सीदी व पेशवा यांच्यात तह होऊन जंजिरा, पद्मदुर्ग हे किल्ले आणि मांडले, नांदगाव, दिवे, श्रीवर्धन ही गावे सीदीकडे राहिली आणि पेशव्याकडे बिरवाडी, तळे घोसाळे हे किल्ले व निजामपूर, गोरगाव ही गावे राहिली. इ.स. १७०७ मध्ये पद्मदुर्गचा किल्लेदार सिरुरखान हा होता. त्यावर्षी सीदी कासीम मरण पावल्यावर तो जंजि-याचा अधिपती झाला. रघुजी आंगरेने दि. २१ फेब्रुवारी १७५९ रोजी हा किल्ला जिंकून घेतला.
किल्ल्यावर ठिकठिकाणी कोरलेली कमळं, लपवलेलं प्रवेशद्वार (म्हणजे जवळ जाईपर्यंत न दिसणारं) या वैशिष्टय़ांबरोबर आणखी एक गोष्ट येथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बांधकाम साहित्यात वापरलेला चुना. दोन घडीव दगड एकमेकांवर ठेवताना खालच्या व बाजूच्या दरवाजांमध्ये वापरलेलं हे ‘सिमेंटिंग मटेरियल’ इतकं भक्कम आहे की सुमारे १६७० च्या आसपास म्हणजे ३२५-३५० वर्षापूर्वी काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याचे दगड समुद्र लाटा, पाऊस व ऊन यामुळे सुमारे १० सें.मी. (४ इंच) झिजलेत, पण चुना तसाच राहिल्याने चुन्याच्या पट्टय़ा वर आलेल्या दिसतात.या किल्ल्यावर चौकोनी खोडाच्या खांडवेल ही औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणावर आढळते. किल्ल्यात अनेक उद्ध्वस्त अवशेष व पाण्याचे हौद आहेत. दरवाजाच्या तटाला लागून असलेल्या जिन्याचे तटावर चढल्यावर चारही बाजूंचे भक्कम तट व सहा बुरूज दिसतात. बुरुजांवर ४०-५० तोफा आहेत. त्यातील चार तोफा खाली खडकावर पडल्या आहेत. बुरुजांच्या दगडी कप-यांनी बांधलेल्या छोटय़ा कमानी, तोफांचे झरोके व तटभिंतीतील जंग्या लक्ष वेधतात.
पद्मदुर्ग.. ! खर तर दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते.. मजबूत तटबंदी.. आतून तटबंदीवर घेऊन जाणाऱ्या पायऱ्या.. तटबंदीला असणारे झरोखे..नि त्यातून बाहेर डोकावणाऱ्या तोफा.. अजूनही अगदी मजबूत स्थितीत असलेले बांधकाम पाहून थक्क व्हायला होते... किल्ल्याच्या आत नव्याने बांधकाम झालेले दिसते ते कस्टम ने मधल्या काळात राहण्यासाठी खोल्या वगैरे बांधलेल्या.. हे मधलं सिमेंटच बांधकाम सोडलं तर बाकी किल्ला देखणीय ठरतो.. तटावर नेणार्‍या पायर्‍या, रुंद अशा तटावर बांधलेल्या खोल्या, फुलाच शिल्प असलेले झरोखे, ..याच किल्ल्याच्या एका बुरुजावरुन पडकोट खूप सुंदर दिसतो..नि पडकोटाच वैशिष्ट्य असे कि कमळाच्या आकाराचा बुरुज.. म्हणूनच कि काय पद्मदुर्ग असे नाव पडले असावे.. आजही हा बुरुज तितकाच भक्कम आहे.. पडकोटावर जाताना मध्ये वाळूची पुळण लागते.. असंख्य शंख- शिंपल्याचा चुराडा पडलेला दिसतो.. त्यातून काही कलात्मक आकार शोधण्यात आगळीच मजा.. पडकोट बघताना साहाजिकच 'कमळ'बुरुज बोलावून घेतो.. बुरुजाच्या कडांना कमळाच्या पाकळ्यांचा आकार देऊन या बुरुजाला एक वेगळंच वलय निर्माण करून दिलय.. आणि यामुळेच पद्मदुर्ग हे नाव या जलदुर्गाला अगदी शोभून दिसत..इथेच पुढे तटबंदी मध्ये शौचालयची व्यवस्थासुद्धा केलेली दिसते.. पुढे काही कोठार आहे नि काळाच्या ओघात बरंच काही वाळूखाली गेलेलं दिसत.. पडकोटाच्या बाहेरील बाजूने फेरफटका मारला कि लक्षात येते की किती मजबूत चुना वापरून काम केलेय..इथेच त्या बुरुजाच्या बाहेरील बाजूस भिंतीच्या खाचेत तोफगोळे अडकलेले दिसतात..इथून जंजिरा खूपच लांब वाटत असल्याने इतक्या दुरून तोफमारा पोचत असेल ?
सिद्दीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने बांधलेला हा किल्ला पाहून नक्कीच उर भरून येतो.. जंजिरा हा खाडीच्या तोंडावर व प्रशस्त अशा खडकावरच बांधला आहे तर पद्मदुर्ग, भर समुद्रात बांधावा लागला. त्यामुळे पद्मदुर्गाचं बांधकाम खूपच कठीण व जोखमीचं होतं. तरीही हा प्रकल्प हातीं घेण्याचा निर्णय व व पूर्ण करण्याची जिद्द हें शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा एक तेजस्वी पैलूच !सिद्दीच्या हल्ल्यांना तोंड देत देत ह्या किल्ल्याचे मोठ्या जबाबदारीने बांधकाम पार पाडणाऱ्या दर्यासारंग व दौलतखानाचे देखील कौतुक वाटून जाते !
सौजन्य : योगेश शुक्ला, जळगाव 

Thursday, June 14, 2018

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश देण्याच्या सूचना - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषित केलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न


मुंबई, दि. १४ : मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात आली आहे. निम्मे शुल्क भरून प्रवेश न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात घोषित केलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
श्री. पाटील यांनी सांगितले की,पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्याच्या लेखी सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क राज्य शासन भरणार आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही योजना लागू राहणार आहे.
व्याज परतावा योजनेत पहिल्या महिन्याचे मुद्दल व व्याज शासन देणार 
स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील उद्योजकांना दहा लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य शासन भरणार आहे. परंतु पहिल्या महिन्यात व्याज व मुद्दलाचा बोजा पडणार असल्यामुळे या तरुणांना दिलासा देण्यासाठी त्यांचे पहिल्या महिन्याचे कर्जावरील व्याज व मुद्दलाची रक्कम राज्य शासन बँकेत भरणार आहे. तर दुसऱ्या महिन्यापासून व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात महामंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
वसतिगृहासाठी दहा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती देणार 
श्री. पाटील म्हणाले की, जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी राज्यातील दहा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पडिक इमारतीमध्ये वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत.  या इमारतींचे नूतनीकरण करून त्या संस्थांना वसतिगृह चालविण्यासाठी मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार असून आठवडाभरात याची जाहिरात देण्यात येणार आहे. यासाठी एकापेक्षा जास्त संस्थांनी अर्ज केल्यास त्यासंबंधीचा निर्णय संबंधित समिती करणार आहे.
यावेळी सारथी संस्थेचे सदस्य डी.आर. परिहार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे,वैद्यकीय शिक्षणचे सचिव संजय देशमुख, बार्टीचे महासंचालक श्री. कणसे आदी यावेळी उपस्थित होते.

Friday, June 1, 2018

७० वर्षाची एस टी बस.......

१ जून १९४८ - पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली.
बीएसआरटीसीची (बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन) पहिली बस यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती, त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी बस नेता आली. हीच त्या काळातील राज्य परिवहन म्हणजे आजच्या एसटीची सुरुवात होती. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.
साडेपंधरा हजार बसेसचा ताफा, दररोज १७ हजार मार्गांवर ७० हजार प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, २४७ आगारे…..आणि वर्षाकाठी फायदा झालाच तर जेमतेम पाच कोटी रूपयांचा……….महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन मंहामंडळाची म्हणजेच सर्वसाधारण भाषेतील ‘एसटी‘ची ही बोलकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत. व्यवहारात लोक जिला “लाल डबा’असे संबोधतात ती एसटीची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांपासून ते थेट नगरे-महानगरांपर्यंत पोहोचते. एसटीचे हे भक्कम आणि विस्तीर्ण जाळेच लाल डब्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. शासकीय म्हणून भरवशाची सेवा, माफक दर आणि विनम्र कर्मचारी ही सुद्धा एसटीची वैशिष्टे म्हटली पाहिजेत. एस टी च्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत ‘एसटी’च्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत . ‘एसटी’ला  ना स्वायतता , ना  ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एस टी  विविध सवलती प्रवासांना देते आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले विस्तीर्ण जाळे ही एसटीची महत्त्वपूर्ण जमेची बाब आहे. ‘गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. सर्व खासगी प्रवासी कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवले तरी त्यांना एवढ्या खेड्यापाड्यांपर्यंत बससेवा सुरू करता येणार नाही.
लाल डबा हे लोकांचं तसं आवडीचं नाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचं असेल तर प्रायव्हेट बसगाडय़ांची काही कमतरता नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने ‘गडया… अपुला लाल डबाच बरा!’ असं म्हणत आपण एसटीलाच प्राधान्य देतो. अशा या महामंडळाचे डेपो असलेलं मोठं आगार म्हणजे मुंबई सेंट्रलचं आगार होय. असा हा मुंबई सेंट्रलचा डेपो सगळ्यात जुना आणि पहिल्या क्रमांकाचा डेपो म्हणूनच ओळखला जातो.पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरच असलेला राज्य परिवहन मंडळाचा हा मुंबई सेंट्रलचा डेपो म्हणजे मुख्यालय आहे. या डेपोची स्थापना १९५० साली झाली. मुंबई सेंट्रलचा भाग हा मध्यवर्ती असल्याने तिथेच मोठी जागा घेतली आणि या सगळ्या बसेस एकाच छताखाली आल्या. हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली आणि इथला लोड वाढला. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये तर एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे म्हणजे फॅशन झाल्यासारखे वाटते. एस.टी.वर टीका करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जे मार्ग फायद्याचे नाहीत त्या मार्गावरही नुकसान सोसून एस.टी. ची गाडी धावते आहे. ज्या खासगी वाहतूकदारांची तरफदारी लोक करीत आहेत, ते खासगी वाहतूकवाले जेवढे फायद्याचे मार्ग, त्या फायद्याच्या मार्गावरच त्यांच्या गाडय़ा चालवतात.या खासगी वाहतूकदारांना एस.टी.सारखी स्टँण्डसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यांचे ‘थांबे’ नाहीत. आपल्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे, असे समजून या खासगी गाडय़ा रस्त्यावरच उभ्या असतात, तिथेच प्रवासी भरतात. एस.टी.मध्ये एक लाख कामगार आहेत. १० मध्यवर्ती गॅरेज आहेत. तिथल्या कामगारांना नेहमी पगार आहे, युनिफॉर्म आहे, कामगार क्षेत्रातला बोनस आहे, हक्काच्या रजा आहेत. एस.टी.मध्ये स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास आहे, विद्यार्थ्यांना सवलती आहेत. सामाजिक बांधिलकीची सर्वात मोठी जाण महाराष्ट्रातल्या एस.टी.नेच ठेवलेली आहे. यापैकी कसलीही जबाबदारी खासगी वाहतूकदार घेत नाहीत. त्यांच्या तिकिटांचे दर त्यांना हवे तेव्हा वाढवतात. त्यावर कोणताही निर्बंध नाही, परिवहन खात्याला ते जुमानत नाहीत.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचे प्रवासाचे सर्वात त्यामानाने स्वस्त आणि सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून खेडय़ा-पाडय़ात एस. टी. हेच सगळय़ात मोठे साधन आहे. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवली जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. या एसटीच्या डेपोचं वैशिष्टय़ म्हणजे जो कधीही झोपलेला किंवा शांत आढळणार नाही. सतत वर्दळ असते. म्हणजे या ठिकाणी २४ तास एसटी बसेसची ये-जा सुरू असते. कधी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी गावी जाण्यासाठी डेपोला गेलात तर तुम्हाला जवळपास दोनशे गाडया या डेपोमध्ये विश्रांती घेत उभ्या दिसतील.  हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आगारे म्हणजे  चोवीस तास चाकरमान्यांची अविरत सेवा सुरू असते. कधीतरी एसटीची ही दिवस अन् रात्रीची धावपळ पाहायला एखादा तरी या आगारांत फेरफटका मारायला हवा.

Source  by Mr. Yogesh Shukla(designer at Mrudang associate, Jalgaon)