Search This Blog

Tuesday, March 20, 2018

आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा ! - एकनाथ खडसे यांची संतप्त मागणी...

 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. खडसेंनी आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सरकारला फटकारले.
"सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं. असे खडसे म्हणाले"
    जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे.एमबीबीएस नसतील, तर बीएएमस डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश खडसेंनी उपस्थित केला करुन आरोग्य मंत्र्यांना त्या विषयी जाब विचारला. खडसेंनी म्हटले जेव्हा, आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत १० जणांचे १०० होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचे ? असा प्रश्न खडसेंनी सभागृहात उपस्थित करुन मला पण ट्रान्सफर करा.. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या चर्चेत बोलताना त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. व्हेंटिलेटर सारख्या सुविधा मिळत नसल्यावरून बोलताना त्यांनी ‘केवळ लाखो लोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन चालणार नाही तर ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सुविधा हि द्याव्या लागतील’, असे म्हणत त्यांनी महाजन यांना टोमणा मारला. तसेच मुक्ताईनगरात वैद्यकीय अधिकारी नाहीत जळगाव आणि मुक्ताईनगर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत अनेक बैठक झाल्या. फोन वरही त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी सकारात्मक आश्वासन अनेक वेळा दिले पण रिक्त पदे भरली गेली नाहीत.
सरकारवर टीका करायची म्हणून बोलत नाही
राज्यात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरच्या रुग्णाला जेजे रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले नाही. हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा सवाल करत त्यांनी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. सरकारवर टीका करायची म्हणून मी बोलत नाही तर सामान्य माणसांच्या प्रश्नावर मी बोलत असल्याचेच त्यांनी सांगितले. केवळ आरोग्याचं नाही तर आदिवासीच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला घेरले . आमदार आदिवासी भागात काही कामे करतो ,पण त्यांनाही जीएसटीला तोंड द्यावे लागत आहे . त्याचबरोबर पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता कोळी समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी खडसे यांनी केली.

अॅट्रॉसिटीमध्ये तातडीने अटक नाही : सुप्रीम कोर्ट




▪ कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक आता होणार नाही.

▪ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल.

▪ तसेच न्यायालयाने अटकेपूर्वी जामीन अर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आता तुम्हाला जामीन मिळणार आहे.

▪ मुंबईतून दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीत हा निकाल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

▪ विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे, तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचे संरक्षण देण्यात आले आहे.

▪ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे.

Thursday, March 15, 2018

अयोध्येत राम मंदीर नव्हतेच ! बौद्ध समुह ....

दि टाईम्स अॉफ इंडिया च्या वृत्तानुसार अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय.'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची... ही जमीन बौद्ध समूहाची आहे आणि हे अगोदर एक बौद्ध स्थळ आहे' असा दावा बौद्ध समुहाच्या काही लोकांनी केला आहे.
अयोध्येत राहणाऱ्या विनीत कुमार मौर्य यांनी सुप्रीम कोर्टात या संबंधी याचिका दाखल केलीय. वादग्रस्त स्थळावर भारतीय पुरातत्विक सर्वेक्षण विभागाद्वारे (ASI) केलेल्या खोदकामाच्या आधारावर हा दावा केलाय.
अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेन्चच्या आदेशावर असं अंतिम खोदकाम २००२-०३ मध्ये करण्यात आलं होतं.खोदकामातून या जागेवर स्तूप, गोलाकार स्तूप, खांब उभे होते जे बौद्धविहारशी संबंधित असतात.
ज्या ५० खड्ड्यांमध्ये खोदकाम झाले त्यांत एखाद्या मंदिर किंवा हिंदू निगडीत वास्तूचे अवशेष मिळाले नव्हते... बाबरी मस्जिदच्या निर्माणापूर्वी या जागेवर बौद्ध धर्माशी जोडलेली एक वास्तू उभी होती, असा दावा या याचिकेत करण्यात आलाय. 

Wednesday, March 14, 2018

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं.  २१व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले, शारीरिक अपंगत्त्व आलं त्यामुळे हालचालींवर बंधनं आली, कायमस्वरूपी खुर्चीला खिळून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली पण आपल्या शारीरिक अपंगत्त्वाला त्यांनी कधीच यशाच्या मार्गातला अडसर बनू दिला नाही. आपल्या व्हिलचेअरलाच आपली ताकद मानली. विश्वाची निर्मिती कशी झाली.. आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात? अशा ब्रह्मांडातल्या अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि असामान्य बुद्धीकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतं हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिल

भावपूर्ण श्रद्धांजली
महान्युज24x7 तर्फे स्टिफन हॉकिंग यांना ..

Saturday, March 10, 2018

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने शेती करावी - ना.गिरीष महाजन


निम्नतापी प्रकल्पासाठी एका वर्षात दीड हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार

जिल्हा कृषि महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गट सन्मान सोहळ्यात जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

           जळगाव, दि. 10 - शेतकऱ्यांनी जमिनीची गरज ओळखून आवश्यकतेनुसार खते व पाणी द्यावे. यासाठी माती परिक्षण, शास्त्रोक्त बी- बीयाणांचा वापर करुन आधुनिक पध्दतीने शेती करावी व आपले उत्पादन वाढवावे. यासाठी शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांनी दिला.

           शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागरपार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषि महोत्सवात आज आत्मा अंतर्गत निवड केलेले उत्कृष्ट शेतकरी, शेतकरी गट व मागील वर्षी शासनाने सन्मामित केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर ललीत कोल्हे,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक विभागाचे प्रादेशिक कृषि सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषि महोत्सव समितीचे सदस्य तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नाशिक येथील कृषि विभागाचे श्री. ठाकूर, आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन आदि उपस्थित होते.

         यावेळी ना. गिरीष महाजन पुढे म्हणाले की, सध्याचे शासन हे शेतकरी हिताचे शासन आहे. या शासनाने  नुकताच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रासाठी भरीव तरतुद केली आहे.  जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढण्यासाठी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या निम्नतापी प्रकल्पासाठी यावर्षी दीडहजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. तसेच गिरणा नदीवर चाळीसगावपासून  ते बलून बंधारे बांधण्यात येणार आहे. यामुळे  या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच शेळगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा योजनेत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केल्यास त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. राज्यात सिंचनाच्या सुविधा वाढव्यात यासाठी शासनामार्फत जलयुक्त्‍ शिवार ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हयातही भरीव काम झाले असून यामुळे जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढविणे आवश्यक असून जैन इरिगेशन ने जगात जळगावला ठिबक सिंचनात नावलौकिक मिळवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन शास्त्रोक्त शेती करण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.


          याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतीत दिवसेदिवस आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन शाश्वत शेतीकडे वळाले पाहिजे. यासाठी गटशेतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गटशेतीसाठी शासनामार्फत एक कोटी रुपयांपर्यत अनुदान देण्यात येते. याचा जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज, पाणी देतानाचा त्यांना पिकविलेला शेतमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत चांगले रस्ते होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने पाणंद रस्ते योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते करता येणार आहे. असे सांगून शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांची लोकराज्य स्टॉलला भेट

     राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक विभागाचे प्रादेशिक कृषि सहसंचालक दिलीप झेंडे यांनी कार्यक्रमाच्यापूर्वी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला भेट देऊन लोकराज्य मासिकाच्या अंकांचे अवलोकन केले. याप्रंसगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लोकराज्य मासिकाचा अंक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्याचे माजीमंत्री पंतगराव कदम यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी आत्मातंर्गत निवड केलेल्या शेतकऱ्यांचा व शेतकरी गटांचा तसेच शासनाने मागील वर्षी सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांना मंत्रीमहोदय व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

           सन्मान व सत्कार करण्यात येणारे शेतकरी - श्री. नाना भाऊसिंग पाटील, पिंप्री खु. ता. चाळीसगाव, श्री वसंत वामन पाटील, परधाडे ता. पाचोरा, श्री. मधुकर नारायण पाटील, सुनसगाव ता. जामनेर, श्री. संदिप जगदिश पाटील, मु. पो. करंज, ता. जि. जळगाव, श्री. अनिल उखर्डा पाटील, मु. पो. पारंबी, ता. मुक्ताईनगर, श्री. कमलेश धर्मराज पाटील  कु.पो. बाहुटे, ता. पारोळा.

         शेतकरी गट - धनदाई माता शेतकरी गट, शिंदी, ता. भडगाव, जय भवानी शेतकरी गट, शिरसगाव, ता. चाळीसगाव, कुलस्वामिनी शेतकरी गट, मु.पो. देवगाव देवळी, ता. अंमळनेर, जय शिवाजी कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. सुनसगाव, ता. भुसावळ, संत जनाबाई महिला कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. मस्कावद, ता. रावेर.

        शासनाने सन्मानित केलेले शेतकरी - कृषिभूषण श्री. विश्वासराव आनंदाराव पाटील, मु. पो. लोहारा ता. पाचोरा, श्री. प्रेमानंद हरी महाजन, मु. पो. तांदलवाडी, ता. रावेर, श्री. नारायण शशीकांत चौधरी, मु. पो. भालोद, ता. यावल, श्री. रविंद्र मार्तंड पाटील, मु. पो. चिंचोली, ता. यावल यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.

           कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठया प्रमाणात शेतकरी, तंत्रज्ञ, सत्कारार्थींचे कुटूंबिय व नागरीक उपस्थित होते. आज महोत्सवात मका पीकावर डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन आणि मोतीलाल मयाराम पाटील, प्रगतीशील शेतकरी, एकलग्न यांचे चर्चासत्र संपन्न झाले.

कृषि महोत्सावात 11 मार्च रोजी कापूस पीकावर चर्चासत्राचे आयोजन

  जिल्हा कृषि महोत्सवात रविवारी (11 मार्च रोजी) कापूस पीकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत कापूस गुलाबी बोंडअळी नियंत्रण या विषयावर डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन यांचे तर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत कापूस उत्पादन वाढीची सुत्रे या विषयावर औरंगाबाद येथील नाथ बायोजीनचे सल्लागार माधव धांदे व एकरी 49 क्विंटल कापूस उत्पादन  घेणारे शहादा, जि. नंदूरबार येथील शेतकरी नारायण कृष्णा ठाकूर यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
           जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या चर्चासत्रास मोठया संख्येने उपस्थित रहावे. तसेच शहरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Friday, March 9, 2018

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन


  जळगाव, दि. 9 - जिल्ह्यातील अनुदानित तसेच विना अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यानी त्यांचेकडील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्काचे प्रस्ताव, बी-स्टेटमेंट प्रस्ताव तीन प्रतीत सीडीमध्ये तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
  शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2017-18 करीता शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क 100 टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करुन त्यांच्या आधार संलग्नीत बँक खात्यावर वर्ग करण्याकरीता कळविण्यात आलेले असल्याने सर्व महाविद्यालयांनी ही कार्यवाही तातडीने करावीत असेही श्री. गायकवाड यांनी कळविले आहे.

Wednesday, March 7, 2018

विद्यार्थी परिषद सभापती व सचिवांनी साधला थेट विद्यार्थ्यांशी संवाद



  •  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 2017-18 या शैक्षणिक वर्षात  पहिल्यांदा विद्यार्थी परिषद सभापती व सचिव यांचा  विद्यार्थ्यांशी संवाद व्हावा या साठी विद्यार्थी संवाद आयोजित केला आहे. या संवादात विद्यापीठ संलग्नित  महाविद्यालयात सभापती दिगंबर पवार व सचिव प्रियांका चौधरी यांनी परिसरातील विद्यार्थी परिषद सदस्य प्रवास करून विद्यार्थ्यांशी हितगुज साधून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे हा विद्यार्थी संवादाचा मुख्य उद्देश आहे. आज जळगाव शहरातील मु.जे.महाविद्यालय, जी.डी. बेंडाळे महाविद्यालय,जी.एच.रायसोनी कला व विज्ञान महाविद्यालय, एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय मध्ये यांनी विद्यार्थ्यांनशी संवाद साधला यात विद्यापीठाच्या योजना विद्यार्थ्यांना सांगितल्या. या नंतर विद्यार्थ्यांनि खुली चर्चा सभापती व सचिवांनी साधली  विद्यापीठ व महाविद्यालयातील प्रश्न मांडले. पहिल्यांदाच विद्यापीठाचे सभापती व सदस्य अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.



Sunday, March 4, 2018

बारावीच्या गणित विषयाच्या १ हजार १८० उत्तरपत्रिका जळून राख...

 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून राख झाल्या आहेत. मात्र आगीचं कारण  मात्र कळू शकलेलं नाही .
सदर घटना केज शहरातील गट साधन केंद्रातील आहे. आज संध्याकाळी ही आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या १ हजार १८० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. 
शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १ हजार १८० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून  राख झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Saturday, March 3, 2018

जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे ८ मार्च रोजी होणार थाटात उट्घाटन


     जळगाव, दि. 3 - कृषी विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यत पोहोचविणे. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संशोधनाचा विस्तार करणे. शेतकऱ्यांमधील विपणन साखळी सक्षम करणे. समुह/गट शेतीसाठी शेतकऱ्यांना संघटीत करणे. शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा. ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा, याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीश्रृंखला विकसित करणे. कृषीविषयक परिसंवाद व व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाण घेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निवारण करणे. विक्रेता व  खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून येत्या 8 मार्चपासून सागर पार्क मैदानावर राज्य शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देशातील सर्वात मोठया कृषि प्रदर्शनाचे येथील सागर पार्क मैदानावर 8 ते 12 मार्च, 2018 या कालावधीत भव्य जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस प्रकल्प संचालक (आत्मा) शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते.

  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते व महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सागर पार्क मैदानावर होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचेही श्री. सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

  कृषि प्रदर्शनाची संकल्पना - या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतक-यांच्या माध्यमातून शेतक-यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होण्यास मदत करण्यात येणार आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्याने शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकणार आहे. शेतक-यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपुरक व्यवसाय इत्यादीबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट तर घडणारच आहे. परंतु सामान्य शेतक-यांना त्यांच्या शंकाचे निरसनही करुन घेता येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचे आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले आहे.

शासकीय व शासन प्रायोजित उपक्रमाचे स्वतंत्र दालन - या प्रदर्शनात राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ (विस्तार व प्रशिक्षण), महसूल विभाग, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, विविध संशोधन केंद्रे, विविध कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामीण विकास विभाग, स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियानाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य मासिकाचे दालन असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पशुधन विकास महामंडळ, वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, एन. सी. डी. ई. एक्स. नाबार्ड, रेशीम विकास विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अग्रणी बँक, अपेडा, जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादन संस्था बी.एस.एन. एल, मेडा (महाउर्जी) या शासन प्रायोजित उपक्रमांबरोबरच गृहोपयोगी वस्तु व बचत गटांचे स्टॉल, शेतीशी निगडीत औजारे व मशिनरी, सेंद्रीय शेती दालन, धान्य व खाद्य महोत्सवाचाही या प्रदर्शनात सहभाग राहणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयी असणाऱ्या अडीअडचणी, शंकाचे निरसण तर करता येणारच आहे. त्याशिवाय नागरीकांना आपल्याला लागणारा शेतमाल शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर ड्रोनद्वारे शेतमाल फवारणीचे प्रात्यक्षिक हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

  सहभागी होणाऱ्या संस्था व कंपन्या - या प्रदर्शनात शेतमालास लागणारी खते, ॲक्वाकल्चर, औषधे, बायोटेक्नॉलॉजी, बी-बियाणे, टिश्यू कल्चर, औजारे, पाणी व्यवस्थापन, यंत्रसामुग्री, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, ट्रॅक्टर्स इक्विपमेंटस, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, सिंचन साधने, डेअरी इक्विपमेंटस, फलोत्पादक, पोल्ट्री सोल्युशन, पॅकेजिंग, कृषि अर्थसहाय्य, साठवणुक, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन, शासकीय विविध विभाग, कृषी विषयक पुस्तके व नियतकालिके या कंपन्याही सहभागी होणार आहे. या प्रदर्शनात दोनशे हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून यासाठी 248 स्टॉल उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रिफॅब्रिकेटेड स्टॉल्स, चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन, शेतकरी सन्मान समारंभ, खरेदीदार विक्रेता संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

10 मार्च रोजी होणार प्रगतीशील शेतकरी व गटांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
आत्मा अंतर्गत चांगले काम करणारे शेतकरी व गट यांचा सन्मान 10 मार्च रोजी राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक श्री. शिवाजी आमले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये - शेतीमध्ये प्लास्टीकचा वापर, थेट पणन विषयी मार्गदर्शन, भव्य सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल, जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्वीता, शेतमालाचे क्लिनिंग, ग्रेडींग, पॅकेजींग व ब्रॅण्डिंग, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, शेतमाल आधारीत प्रक्रिया उद्योग व निर्यात, हायड्रोफोनिक्स मुरघास विषयी माहिती, शीतसाखळी विषयी माहिती, भव्य धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
जिल्हा कृषि प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समिती नेमण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
 प्रदर्शन 8 ते 12 मार्च या कालावधीत दिवसभर सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार असून जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

Thursday, March 1, 2018

होळी विशेष

प्रतिनिधी ,औरंगाबाद 
होळी विशेष 
होळी  - फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा, महाराष्ट्रात ‘शिमगा’ आणि दक्षीण भारतात ‘कामदहन’ म्हणतात. 
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
“होळीला गवऱ्या पाच पाच….. डोक्यावर नाच नाच”…
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”“शिमगा”“हुताशनी महोत्सव”“दोलायात्रा”“कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
ह्या होळी बद्दल अनेक लोककथा प्रचलीत आहेत. कोकणात ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की :
एकदा काय झालं, एका गावांत एक राक्षसीण आली. ती गावांतल्या लहान मुलांची हत्या करू लागली. गावावरच्या ह्या संकटावर काय उपाय करायचा म्हणून सारा गांव एकत्र जमला. त्यांनी काय केले गावाच्या वेशीवर आणि प्रत्येक घराच्या अंगणांत होळ्या पेटवल्या. साऱ्या गावांत होळ्या पेटलेल्या पाहताच ती राक्षसीण जरा घाबरलीच तरीही ती पुढे पुढे येऊ लागली. मग लोकांनी नाचायला, बोंबा मारायला, वाद्य वाजवायला, त्या राक्षसीणीला शिव्या द्यायला सुरवात केली. लोक तिच्या भोवती कोंडाळे करून नाचू लागले. तो आवाज , तो दारादारांतला अग्नी, तो लोकांचा राग, त्यांचं बोंबा मारणं हे सर्व पाहून ती राक्षसीण घाबरली तिनं त्या गावातून काढता पाय घेतला.
राक्षसीण गावातून जाताच लोक त्याच होळी भोवती आनंदानं नाचू लागले. गावाचं संकट दूर करणाऱ्या त्या अग्नी देवतेचं सर्वांनी पूजन केले. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून कोणत्याही दुष्ट असुरी शक्तीनं गावांत, घरांत इतकांच नव्हे तर माणसाच्या मनांत ही प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा रूढ झाली.
खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती कां? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा ह्यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं ह्या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. आपण ही जे चांगल आहे तेच घ्यायला हवं नाही कां?  
खरी होळी केली ती आपल्या देश भक्तांनी, विलायती वस्तूंची होळी करून परकीय सत्ता उलथून लावली. घरादाराची प्रसंगी प्राणांची होळी करून राष्ट्रभक्त, देशभक्त ह्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. दुष्ट वासना, दुष्ट कल्पना, अविचार ह्यांची होळी करा. मनोमन प्रेम आदर ऐक्य जागवा ते जपा आणि वाढवा, ही होळीची शिकवण विसरून चालणार नाही.