निम्नतापी प्रकल्पासाठी एका वर्षात दीड हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार
जिल्हा कृषि महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गट सन्मान सोहळ्यात जलसंपदामंत्र्यांची ग्वाही
जळगाव, दि. 10 - शेतकऱ्यांनी जमिनीची गरज ओळखून आवश्यकतेनुसार खते व पाणी द्यावे. यासाठी माती परिक्षण, शास्त्रोक्त बी- बीयाणांचा वापर करुन आधुनिक पध्दतीने शेती करावी व आपले उत्पादन वाढवावे. यासाठी शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांनी दिला.
शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागरपार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषि महोत्सवात आज आत्मा अंतर्गत निवड केलेले उत्कृष्ट शेतकरी, शेतकरी गट व मागील वर्षी शासनाने सन्मामित केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर ललीत कोल्हे,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक विभागाचे प्रादेशिक कृषि सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषि महोत्सव समितीचे सदस्य तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नाशिक येथील कृषि विभागाचे श्री. ठाकूर, आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन आदि उपस्थित होते.
यावेळी ना. गिरीष महाजन पुढे म्हणाले की, सध्याचे शासन हे शेतकरी हिताचे शासन आहे. या शासनाने नुकताच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रासाठी भरीव तरतुद केली आहे. जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढण्यासाठी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या निम्नतापी प्रकल्पासाठी यावर्षी दीडहजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. तसेच गिरणा नदीवर चाळीसगावपासून ते बलून बंधारे बांधण्यात येणार आहे. यामुळे या भागातील शेतीला मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच शेळगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा योजनेत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केल्यास त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. राज्यात सिंचनाच्या सुविधा वाढव्यात यासाठी शासनामार्फत जलयुक्त् शिवार ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हयातही भरीव काम झाले असून यामुळे जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढविणे आवश्यक असून जैन इरिगेशन ने जगात जळगावला ठिबक सिंचनात नावलौकिक मिळवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन शास्त्रोक्त शेती करण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतीत दिवसेदिवस आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन शाश्वत शेतीकडे वळाले पाहिजे. यासाठी गटशेतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गटशेतीसाठी शासनामार्फत एक कोटी रुपयांपर्यत अनुदान देण्यात येते. याचा जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज, पाणी देतानाचा त्यांना पिकविलेला शेतमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत चांगले रस्ते होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने पाणंद रस्ते योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते करता येणार आहे. असे सांगून शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांची लोकराज्य स्टॉलला भेट
राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नाशिक विभागाचे प्रादेशिक कृषि सहसंचालक दिलीप झेंडे यांनी कार्यक्रमाच्यापूर्वी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलला भेट देऊन लोकराज्य मासिकाच्या अंकांचे अवलोकन केले. याप्रंसगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लोकराज्य मासिकाचा अंक भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्याचे माजीमंत्री पंतगराव कदम यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी आत्मातंर्गत निवड केलेल्या शेतकऱ्यांचा व शेतकरी गटांचा तसेच शासनाने मागील वर्षी सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांना मंत्रीमहोदय व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
सन्मान व सत्कार करण्यात येणारे शेतकरी - श्री. नाना भाऊसिंग पाटील, पिंप्री खु. ता. चाळीसगाव, श्री वसंत वामन पाटील, परधाडे ता. पाचोरा, श्री. मधुकर नारायण पाटील, सुनसगाव ता. जामनेर, श्री. संदिप जगदिश पाटील, मु. पो. करंज, ता. जि. जळगाव, श्री. अनिल उखर्डा पाटील, मु. पो. पारंबी, ता. मुक्ताईनगर, श्री. कमलेश धर्मराज पाटील कु.पो. बाहुटे, ता. पारोळा.
शेतकरी गट - धनदाई माता शेतकरी गट, शिंदी, ता. भडगाव, जय भवानी शेतकरी गट, शिरसगाव, ता. चाळीसगाव, कुलस्वामिनी शेतकरी गट, मु.पो. देवगाव देवळी, ता. अंमळनेर, जय शिवाजी कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. सुनसगाव, ता. भुसावळ, संत जनाबाई महिला कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. मस्कावद, ता. रावेर.
शासनाने सन्मानित केलेले शेतकरी - कृषिभूषण श्री. विश्वासराव आनंदाराव पाटील, मु. पो. लोहारा ता. पाचोरा, श्री. प्रेमानंद हरी महाजन, मु. पो. तांदलवाडी, ता. रावेर, श्री. नारायण शशीकांत चौधरी, मु. पो. भालोद, ता. यावल, श्री. रविंद्र मार्तंड पाटील, मु. पो. चिंचोली, ता. यावल यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठया प्रमाणात शेतकरी, तंत्रज्ञ, सत्कारार्थींचे कुटूंबिय व नागरीक उपस्थित होते. आज महोत्सवात मका पीकावर डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन आणि मोतीलाल मयाराम पाटील, प्रगतीशील शेतकरी, एकलग्न यांचे चर्चासत्र संपन्न झाले.
कृषि महोत्सावात 11 मार्च रोजी कापूस पीकावर चर्चासत्राचे आयोजन
जिल्हा कृषि महोत्सवात रविवारी (11 मार्च रोजी) कापूस पीकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत कापूस गुलाबी बोंडअळी नियंत्रण या विषयावर डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन यांचे तर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत कापूस उत्पादन वाढीची सुत्रे या विषयावर औरंगाबाद येथील नाथ बायोजीनचे सल्लागार माधव धांदे व एकरी 49 क्विंटल कापूस उत्पादन घेणारे शहादा, जि. नंदूरबार येथील शेतकरी नारायण कृष्णा ठाकूर यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या चर्चासत्रास मोठया संख्येने उपस्थित रहावे. तसेच शहरातील नागरीकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment