Search This Blog

Tuesday, November 14, 2017

जळगावने सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातूनदेशाला नवी दिशा देण्याचे काम केले- किशोर राजे निंबाळकर

देशाच्या विकासात लहान उद्योगांचा महत्वपूर्ण वाटा आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून जळगावचे नाव देशभर गेले असून या उद्योगाने देशाला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
भारतीय रिझर्व बँक मुंबईच्या वित्तीय समावेशन विभागातर्फे खान्देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योजकांसाठी जिल्हा नियोजन भवनात चर्चासत्राचे (टाऊन हॉल मिटिंग) आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव, उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे  सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने लहान उद्योगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हयात पूरक उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. जळगाव, भुसावळ सारखे रेल्वे जंक्शन असून डिसेंबर अखेर विमानसेवाही सुरु होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन उद्योजकांनी आपले उद्योग जिल्हयात सुरु केले पाहिजे असे सांगून उद्योजकांना व कर्जदारांना बँकाकडून मिळणाऱ्या वागणूकीबाबत मात्र त्यांनी खंत व्यक्त केली. ग्राहकांशी संवाद वाढवून बॅकांनी पतपुरवठा वाढविला पाहिजे जेणेकरुन उद्योग उभे राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर या चर्चासत्राच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविल्या जाव्यात असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राचा उद्देश सांगताना भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव म्हणाले की, आतापर्यंत रिझर्व बँक जेथपर्यंत पोहोचली नाही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आजचे चर्चासत्र याच कार्यक्रमाचा भाग आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही विकासात बँक महत्वाचा घटक असल्याने बँकांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली पाहिजे असे सांगून उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख म्हणाले की, प्लॅस्टीक पार्कसाठी जळगाव जिल्हयातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. तसेच केळी प्रक्रिया उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन जिल्हयात तसे क्लस्टर तयार करावे यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. उद्योग विभागामार्फत उद्योगांची नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे  सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय यांनी त्यांच्या विभागामार्फत्‍ उद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी एस. बी. इंडस्ट्रीज आणि समृध्दी प्लॉस्ट च्या प्रतिनिधींना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली. खान्देशात अशाप्रकारचे चर्चासत्र प्रथमच होत असल्याने या चर्चासत्रास जिल्हयातील उद्योजक तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बुऱ्हाडे यांनी तर आभार श्री. दामले यांनी मानले.

No comments:

Post a Comment