आरोग्याच्या प्रश्नांबाबत महाजन यांची मनपा मध्ये तातडीची बैठक..
जळगाव शहरात दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारात सहा जणांच्या मृत्यूची माध्यमात चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमिवर वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांनी आज सायंकाळी उशीरा मनपात पदाधिकारी, अधिकारी व प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या नाकर्तेपणावर ना. महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छता वाढवून साथ रोग नियंत्रणासाठी तंबी दिली. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व इतर नगरसेवकांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व नगरसेवकांनी तक्रारी केल्या की, मनपात मनुष्यबळ व यंत्रणा पुरेशी आहे पण अधिकारी वर्ग काम करीत नाही.मच्छर, डिस निर्मूलनासाठी यंत्रे वापरात नाही. वॉर्डातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. आमदार भोळे यांनी थेट अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सर्व बाजू ऐकून ना. महाजन यांनी सर्वांना झापून काढले. ते म्हणाले, संपूर्ण शहर साथरोगांनी तस्त आहे. प्रत्येक घरात रुग्ण आहे. तरी पण मनपाच्या दप्तरी केवळ ११५ संशयित रुग्णाची पालिकेत नोंद आहे. हेच तर नाकर्तेपणाचे लक्षण आहे. ना. महाजन यांनी धुरळणी यंत्राच्या वापराविषयी विचारल्यार अधिकाऱ्यांनी मान्य केले की, सर्व यंत्रे बंद आहेत. याचे कारण पालिकेने काही वर्षा पासून जंतूनाशकच विकत घेतलेले नाही.
घंटागाड्यांचा विषय आल्यानंतर अनेक वॉर्डात कचरा गोळा करायला घंटागाड्याच येत नाही असे नगरसेवक म्हणाले. याची कारणे अधिकाऱ्यांना विचारली असता, किरकोळ व फालतू कारणे दाखवून घंटा गाड्या जात नाही, असे सांगण्यात आले. मनपाचे कनिष्ट अधिकारी सहकार्य करीत नाहीत असे नगरसेवक म्हणाले.
आपल्या वॉर्डात घंटागाड्या वेळेवर येतील याकडे लक्ष द्या अशी सूचना ना. महाजन यांनी नगरसेवकांना केली. मनपाच्या स्वच्छता विभागात पुरेसे कर्मचारी व यंत्रणा आहे. त्याचा योग्य पध्दतीने वापर करा, असे ना. महाजन म्हणाले.
स्वच्छतेसाठी मनपाला एक महिना मोफत जेसीबी देवू असे आ. भोळे म्हणाले.शहरात साथीचे रुग्ण जास्त आहेत हे लक्षात घेवून कारवाई करा. स्वच्छता मोहीम राबवा, अशीही सूचना त्यांनी केली. नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र टाकायला लावा. कचरापेटीची सवय लावा असेही ना. महाजन म्हणाले.
धुरळणी करणाऱ्यां सोनवणेंचे कौतुक
जळगाव शहरातगेले दोन महिने माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वखर्चाने धुरळणी करुन मच्छर, डास निर्मूलन करीत असल्या बद्दल त्यांचे कौतुक ना. महाजन यांनी केले. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमर जैन, सुनील महाजन व स्वखर्चाने धुरळणी करीत असलेल्या नगरसेवकांचा. उल्लेख करण्यात आला.
No comments:
Post a Comment