जळगाव, दि. 17 - जिल्ह्याचा सांस्कृतिक विकास होण्यासाठी वाचन चळवळ वाढीस लागणे आवश्यक असते. यासाठी शासनाने दरवर्षी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या ग्रंथोत्सावाच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ गावपातळीवर पोहोचण्यास मदत होणार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्ममाने सरस्वती हॉल (लेवा बोर्डिंग) येथे जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तर प्रमूख अतिथी म्हणून महापौर ललीत कोल्हे हे होते. यावेळी व्यासपीठावर सहायक ग्रंथालय संचालक, नाशिक आशिष ढोक, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी युवराज माळी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल अत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव प्रशांत पाटील हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी ग्रंथप्रदर्शन दालनास भेट देऊन पाहणी केली. या ग्रंथदालनात महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकासह विविध मान्यवर प्रकाशकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, ग्रंथ हे गुरु असल्याने ग्रंथालयातून ज्ञानार्जनाचे कार्य होत असते. वाचकांमध्ये वाचनाची व साहित्याची गोडी निर्माण करण्याचे काम ग्रंथालये करीत असतात. हे कार्य गावपातळीपर्यंत जाण्यासाठी गावागावात ग्रंथालय सुरु झाले पाहिजे. यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने स्वत:हून पुढे येऊन नागरीकांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन ग्रामीण भागातही ज्ञानाधिष्ठित पिढी तयार होण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ग्रंथोत्सवाचे उद्घाटक आमदार सुरेश भोळे म्हणाले की, शासन नागरीकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहे. या योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न केले पाहिजे. ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांचा लाभ त्या त्या क्षेत्रातील नागरीकांना होण्यासाठी ग्रंथालय विभागाने नागरीकांमध्ये जनजागृती करावी. लहान मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना आवडणारी पुस्तके ग्रंथालयात असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरीकांसाठी ग्रंथालयात वाचनाची व्यवस्था केल्यास त्यांनाही नवनवीन पुस्तके वाचावयास मिळतील. ग्रंथालय चळवळीच्या वाढीसाठी ग्रंथालय कार्यालयास आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही आमदार भोळे यांनी यावेळी दिले. यावेळी महापौर ललीत कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतूक करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले की, ग्रंथालयाच्या इमारतीसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिली असून इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रक्कम उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी 9 वाजता बहिणाबाई उद्यान येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे पूजन आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथदिंडीत शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमूख मार्गावरुन वाजत गाजत ही दिंडी सरस्वती हॉलच्या ग्रंथोत्सवस्थळी पोहोचली तेथे या दिंडीचे विधिवत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार रतन थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, विविध शाळांचे विद्यार्थी, ग्रंथप्रेमी नागरीक उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्य संमेलन, विविध विषयांवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मान्यवर कवी, साहित्यिक सहभागी होणार असल्याने जळगावकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment