नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या दस्तावरील मुद्रांक शुल्कामध्ये लोकहितास्तव 80 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे रहिवाशांना केवळ 20 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
नागपूरच्या नाईकवाडी येथील नागनाथ बळवंत काळे यांच्या ख.क्र. 108/1 आणि ख.क्र. 108/2 व मौजा बिनाकी ख. क्र. 55 येथील मालकीच्या एकूण 13.81 हेक्टर इतक्या वडिलोपार्जीत जमिनीवरील बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी आजचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या जमिनीच्या मालकाकडून होणाऱ्या हस्तांतरण संलेख तथा दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (ब) अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क लोकहितास्तव 80 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यानुसार आकारणीयोग्य असलेल्या एकूण मुद्रांक शुल्काच्या 20 टक्के इतकीच रक्कम भरावी लागणार आहे.
मुद्रांक शुल्काची ही सवलत या जमिनीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या 22 जानेवारी 2019 रोजीच्या मंजूर अभिन्यास नकाशातील मिळकतीला लागू राहील. आजच्या निर्णयानुसार ज्या रहिवाश्यांच्या नावाने हस्तांतरण दस्त होणार आहेत असे रहिवासी हे बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टीतील रहिवासी असल्याचे नागपूर महानगरपालिकेने प्रमाणित करणे आवश्यक आहे. अशा लाभार्थ्यांची प्रमाणित यादी नागपूर महानगरपालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आजचा निर्णय शासन राजपत्रात अधिसूचित होऊन प्रसिद्ध होण्यापूर्वी हस्तांतरण दस्ताशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने मुद्रांक शुल्काचा भरणा शासनाकडे केला असल्यास त्यांना त्याचा परतावा मिळणार नाही.
No comments:
Post a Comment